सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोलापूर : प्रतिनिधी
ऑइल कंपन्यांनी सगळे पेट्रोल पंप ऑनलाइन करून त्याचा ओटीपी स्वतःकडे ठेवला आहे. याच धर्तीवर राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन करून साखर आयुक्त कार्यालयाशी का जोडले जात नाहीत, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी विचारला आहे. मात्र यावर अनेक पर्याय असू शकतात, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.
गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद काढण्यासाठी राज्यभर दौऱ्याचे आयोजन केले आहे. सोलापुरात आल्यानंतर त्यांनी साखर कारखानदारीतील चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. सरकार साखर कारखानदारांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला.
पूर्वी पेट्रोल पंपावर ग्राहकांना पेट्रोल देताना कमी पेट्रोल दिले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ऑइल कंपन्यांनी सगळे पेट्रोल पंप आता ऑनलाइन जोडून घेतले आहेत. या पेट्रोल पंपात काही किरकोळ दुरुस्ती करायची असेल तरी ऑइल कंपन्यांना कळवावे लागते, त्यांच्याकडून ओटीपी मागून घेऊन दुरुस्ती केली जाते. लाखो पेट्रोल पंपावर तेल कंपन्यांचे आता नियंत्रण आहे.
राज्यात अवघे २०० साखर कारखाने आहेत, त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे असताना साखर आयुक्त कार्यालयाला ऑनलाइन जोडण्यात काय अडचण आहे ? यंदाच्या गळीत हंगामात ऑनलाइन वजन काटे जोडण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.