वाई ! वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांसाठी वाई येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र दिवाणी न्यायालयास मंजुरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांसाठी वाई येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र दिवाणी न्यायालयास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून वाई येथे हे न्यायालय प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी पद भरतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा विधी मंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होईल अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.
         याबाबत त्यांनी सांगितले की, सर्व वकील बंधूंनी वाई येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन मागणी केली होती. पुन्हा राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा विधी मंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची नवी इमारत उभारण्यास पाचेक वर्ष लागतील तोपर्यंत उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे तर  सध्या वाई न्यायालयाच्या इमारतीतच अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू करावे अशी मागणी आपण केली आहे. तशी सर्व सुविधा इथे उपलब्ध असून पदनिर्मिती केल्यास कामकाज सुरू होऊ शकते.
          यामुळे या तिन्ही तालुक्यातील जनतेला जिल्हा न्यायालयीन कामकाजासाठी सातारा येथे जाण्याचा त्रास वाचेल. या कामाचे महत्व पटल्याने या दोन्ही नेत्यांनी हा प्रश्न गतीने मंजूर होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या असून अगदी दसरा, दिवाळी आधी या निर्णयाच्या मंजुरीची गोड बातमी जनतेला मिळेल, असा विश्वास मदन भोसले यांनी व्यक्त केला.
To Top