सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : हेमंत गडकरी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून स्थानकाच्या आतील भागात प्रवाशांना बसण्याची कसलीच व्यवस्था नसल्याने हे बस स्थानक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाल्याचे चित्र आहे.
नीरा बारामती मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, नोकरदार या मार्गाने एस टी बस ने प्रवास करत असतात. त्यातून एस टी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. या मार्गावर माळेगाव, पणदरे, वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर एस टी महामंडळाच्या वतीने बस स्थानक उभारण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी उद्योजक आर एन शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बस स्थानके बांधून दिले आहेत.
मात्र कोऱ्हाळे बुद्रुक येथील बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्थानकात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या पूर्णपणे तुटल्या आहेत. शिवाय बस स्थानक पूर्णपणे खचले आहे. प्रवाशांच्या बैठकीसाठी बांधलेली बाके पूर्णतः तुटली आहेत. त्यांचा राडारोडा बस स्थानकात सर्वत्र पसरला आहे. पावसाच्या दिवसात यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांना बस स्थानकाचा वापर करता येत नाही. गेली कित्येक वर्षे बस स्थानकाची अवस्था अशीच आहे. एसटी महामंडळाचे या स्थानकाकडे दुर्लक्ष आहे. निरा बारामती मार्ग सध्या तीन पदरी होत आहे. त्यामुळे हे बस स्थानक पाडून पाठीमागे सरकून प्रशस्त बस स्थानक बांधावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
..........
माणिक चव्हाण , ज्येष्ठ प्रवाशी
मी एसटी महामंडळाच्या बसेसने नेहमी ये - जा करतो. मात्र गावातील बस स्थानक बसण्या योग्य नसल्याने कधी उन्हात ताटकळत तर कधी पावसात भिजत बसची वाट पहावी लागते. त्यामुळे एक तर नवीन बस स्थानक बांधावे किंवा या बस स्थानकाची योग्य डागडुजी करावी.
..........
प्रशांत लव्हे, अध्यक्ष भाजप विद्यार्थी आघाडी
बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. एस टी महामंडळ ला याबाबत वेळोवेळी कळवले आहे. मात्र आता या बस स्थानकाची दुरुस्ती न झाल्यास भाजप विद्यार्थी आघाडी आंदोलन करणार आहे.