सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गणेशोत्सव कालावधीत रणसंग्राम मित्र परिवार, वेळे, तालुका वाई यांनी देशसेवा करणाऱ्या सैन्य व पोलीस दलातील जवानांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. वेळे येथील मारुती मंदिर चौकात वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे व भुईंज येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांचे हस्ते गावातील चाळीस जवानांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रणसंग्राम मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गावातील सर्वच आजी माजी सैनिक व पोलीस दलातील जवानांचा सन्मान करण्यात आला. रणसंग्राम मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे चोविसावे वर्ष आहे.
गावातील तरुण व होतकरू विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन सुविचार शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब सपकाळ यांच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थी व पालक यांचा संयुक्त मेळावा घेवून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण त्यांनी केले. या मेळाव्यास बरेच विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावली होती.
डॉ. शीतल जानवे खराडे यांचे हस्ते रणसंग्राम गणेश मंडळातील गणाधिशाची महाआरती करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. देशसेवा बजावणाऱ्या सर्वच जवानांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या हातून चांगली देशसेवा घडली व यापुढेही आपल्या गावातील तरुणांनी अशीच प्रगती करावी व समाजाचा आलेख नेहमी वाढता ठेवावा, असे प्रतिपादन डॉ.शीतल जानवे खराडे यांनी उपस्थितांना केले.
रणसंग्राम मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो. नि.आशिष कांबळे, बीट अंमलदार विजय देशमुख, गोपनीय विभागाचे सचिन नलावडे यांचेसह वेळे गावातील चाळीस जणांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रणसंग्राम परिवाराच्या वतीने शरद पवार, दीपक पवार, जितेंद्र पवार, शिवाजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अशोक ननावरे यांनी आभार मानले.