सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर, : प्रतिनिधी
परिपूर्ण शिक्षक होण्यासाठी आपण आपले व्यक्तीमत्व तपासत राहिलं पाहिजे. आणि आढळलेले दोष दूर करत राहिले पाहिजे. विद्यार्थी काळाबरोबर पुढे चाललेत. त्यांच्या आत डोकावता यावे यासाठी आपणही स्वतःला सतत 'अपडेट' करत राहिले पाहिजे. समाजात काही ठिकाणाहून शिव्याशाप मिळत राहतील. आपले पगार, रहिवास काही लोकांना खुपु लागले आहेत. पण आपण शांतपणे आपले काम करत राहू, असे मत लेखक प्रा.. कुंडलिक कदम यांनी व्यक्त केले.
येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन व्यवस्थापन समिती सदस्य ऋषिकेश धुमाळ होते. याप्रसंगी पत्रकार संतोष शेंडकर, महेश जगताप, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रवीण ताटे, प्रा. सुजाता भोईटे, डॉ. नारायण राजुरवार, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. निलेश आढाव आदी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त आज महाविद्यालयाचे विद्यार्थीच शिक्षक बनले होते. कदम म्हणाले,लोकं वाचत नाहीत असं आता बोललं जातं आहे. आता शिक्षकांनी वाचल पाहीजे आणि जे वाचतो त्याबद्दल लिहून समाज माध्यमात पाठवलं पाहिजे. त्यामुळे लोकांची पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढेल आणि ते पुस्तकाकडे वळतील. वाचनाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपापला स्वर्ग वर शोधण्यापेक्षा वाचनातून निर्माण होतो असे मत प्रा. कदम यांनी मांडले. प्राचार्य डॉ. वायदंडे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांना आव्हानात्मक आहे. काही गोष्टी उपयोगाच्या तर काही धोक्याच्या आहेत. स्थानिक कला, कौशल्याना त्यात वाव आहे. त्यात विद्यार्थी व्यवस्थापन व कला या दोन्ही शाखेचे शिक्षण घेऊ शकतो. मात्र यात छोटी महाविद्यालये बहुशाखीय महाविद्यालयात समाविष्ट करण्यात येणार आहेत. ऑनलाइन शिक्षण, कौशल्य शिक्षण यावर भर दिला जाणार आहे. महाविद्यालय स्वायत्त होतील. त्यामुळे शिक्षकांना काळानुसार स्वतःमध्ये अनेक बदल करावे लागणार आहेत.