सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
तब्बल ३ हजार विड्यांची पाने, सोबतीला झेंडू, गुलछडी, निशिगंधाची फुले. सारी रात्र जागर करून पहाटेपर्यंत उत्स्फूर्त निरपेक्ष निस्वार्थीपणे राबलेले हात. या भक्तीच्या जागरातून महालक्ष्मी मंदिरात झालेली पाना फुलांची सजावट लक्षवेधी, प्रत्येकाची वाहवा मिळवणारी, नवरात्रीचे भक्तिमय वातावरण मंगलमय करणारी ठरली आहे.
देवस्थान ट्रस्टने होकार आणि कृतिशील पाठिंबा दिला आणि या सर्व तरुणाईची ही मेहनत सार्थकी लागली.
अभिजित भुजबळ, करण भुजबळ, अभिषेक भुजबळ, विजय भुजबळ, आशिष भोसले पाटील, तेजस देशमुख, दिनेश देशमुख, संकल्प देशमुख, साहिल भोसले, अथर्व गवळी, कुणाल खरे, शिवम शिंदे, सोमनाथ पवार, सुमित पाटणकर आदी बहाद्दरांनी एकजुटीने ही किमया साकारली.
प्रत्येक पूजेत आवश्यक असलेली पानं किरणशेठ तांबोळी तथा बापूंकडून, निकमवाडी, चिंधवली येथून फुलं, रामदास वालेकर यांच्या दुकानातुन इतर साहित्य उपलब्ध करून रात्री ११ वाजता त्यांनी या सजावटीला सुरुवात केली. पहाटे ४.३० वाजता हे काम पूर्ण झाल्यावरच सारे थांबले. भल्या पहाटे आरतीला आलेल्या भाविकांनी जेव्हा विस्फारलेल्या डोळ्यांनी याचे कौतुक केले तेव्हा रात्रभर जागर करून या साऱ्या पोरांच्या थकल्या भागलेल्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव उमठले नसतील तरच नवलच.
काल अनिल लोखंडे याने बजावलेल्या निरपेक्ष सेवेचा निनाद अजूनही काना, मनात घुमत असताना आज पहाटे झालेले निस्वार्थ भक्तीयज्ञाचे दर्शन विशेष सुखावणारे ठरले. अशा अनेक देखण्या हातांनीच नवरात्रीच्या उत्सवावर भक्तीचा कळस रचला जात आहे.
नवरात्रीच्या नवरंगात आपल्या भक्तीचा रंग भरणाऱ्या या साऱ्या साऱ्यांचे अभिनंदन