सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
प्रश्नच येत नाही... अस्तरीकरण होऊन देणार नाही. तुम्हाला कालव्याची उंची वाढवायची असेल तर वाढवा. मुरूम टाका, ज्याठिकाणी पाझर आहे तिथे खोलीकरण करा. त्यातील माती काढा. मात्र कॅनॉलवर एक सिमेंटच घेमेलंही टाकू देणार नसल्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे नेते व कॅनॉल बचाव संघर्ष समितीचे नेते सतिश काकडे यांनी दिला आहे.
'सोमेश्वर रिपोर्टर'शी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आजच्या बारामती याठिकाणी झालेल्या बैठकीत अस्तरीकरण नको म्हणणाऱ्यांच्या बाजूने बोलावलेल्या या बैठकीत अस्तरीकरण हवे असे म्हणणारे शेतकरी देखील आल्याने प्रचंड गोंधळ बैठकीत उडाला. जे आज अस्तरीकरण हवे असे म्हणणारे यांना देखील पाणी मिळणार नाही. त्यांचं फक्त भूत उभं केलं असल्याचा टोला काकडे यांनी लगावला.
-------------------
घटनाक्रम-------
जिल्हा शेतकरी कृती समिती व कालवा बचाव समितीसह विविध शेतकऱ्यांची आज बारामतीच्या जलसंपदा कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत जलसंपदा खात्याचे अधिकारी यासंदर्भातील भूमिका मांडणार होते. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या सूचनांचा परामर्श घेणार होते. प्रत्यक्षामध्ये अस्तरीकरण नको म्हणणाऱ्यांबरोबरच अस्तरीकरण हवे असे म्हणणारेही शेतकरी आल्याने शेतकऱ्यांमध्येच दोन गट पडले. सुरुवातीस कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी निरा डावा कालवा अस्तरीकरणासंदर्भात शासनाची म्हणजे जलसंपदा खात्याची भूमिका मांडली. त्यानंतर काही वेळातच या गोंधळाला सुरुवात झाली.
एकाच बैठकीत दोन परस्परविरोधी विचाराचे शेतकऱ्यांचेच गट आल्याने पाहता पाहता गोंधळ वाढला आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. या बैठकीस शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, माळेगावचे संचालक मदनराव देवकाते यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने आले होते.
दरम्यान यासंदर्भात जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनीच अस्तरीकरण हवे असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना बोलवल्याने या गोंधळाची भर पडल्याचे मत येथे आलेल्या शेतकऱ्यांनी मांडले. तर दुसरीकडे आम्ही कोणालाही या किंवा नको असे म्हटलेले नव्हते अशी भूमिका सरकारी सूत्रांनी मांडली. दरम्यान येथे गोंधळाची परिस्थिती दिसताच बारामती शहर पोलिसांनी जलसंपदा कार्यालयाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना पाणी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, मात्र येथे दोन परस्परविरोधी विचाराचे शेतकरी असल्याने कोणत्याही परिस्थितीची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता आपण सर्वांनी आपापल्या लोकशाही मार्गाने स्वतंत्र भूमिका मांडावी, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था गंभीर निर्माण होऊ नये याकरता ही बैठक येथे संपवावी अशी विनंती केली त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
दरम्यान सतीश काकडे यांनी यासंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक बोलावू असे सांगितले. आपण अस्तरीकरण नको असेच म्हणत आपली बाजू मांडली होती. परंतु या ठिकाणी अस्तरीकरण हवे असे म्हणणारे देखील शेतकरी आल्याने या बैठकीत कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नाही असे काकडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले. दरम्यान या संदर्भात नव्याने बैठक बोलणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांकडे स्पष्ट केले.