सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
किसन वीर कामगार पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी कामगारांना दिलेल्या शब्द खरा ठरवित किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करीत त्यांना दिड महिन्याचे वेतन अदा केले असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व किसन वीर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांचा यथोचित सत्कार किसन वीर कामगार युनियनच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, किसन वीर व खंडाळा कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी जे मागील तीन चार वर्षात सोसलेले आहे, याची कल्पनाही करवत नाही. शेतकऱ्यांनी व कामगारांचा मागील तीन-चार वर्षात ना दसरा ना दिवाळी गोड झाली. मात्र याचा काहीही फरक मागील संचालक मंडळावर पडलेला नव्हता व दिसतही नव्हता. त्यांनी फक्त स्वतःची दिवाळी गोड करण्यात धन्यता मानलेली होती. याचा फरक असा पडला होता की कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर मोल मजुरी करण्याची वेळ आलेली होती. शेतकरी व कामगारांच्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी आपली आमदारकी पणाला लावून कारखाना वाचविण्यात पुढाकार घेतला व त्याला सर्वांची साथ मिळालेली आहे व यापुढेही मिळेल असा विश्वास आम्हाला आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या कामगारांना दिवाळीसाठी दिड महिन्याच्या पगाराची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे. कामगारांना दिड महिन्याचा पगार अदा केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसांडुन वाहत होता, तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. खंडाळा कारखान्याच्या गळित हंगामास नुकतीच सुरूवात केलेली असून लवकरच किसन वीरही सुरू होणार असून शेतकऱ्यांनी आपला नोंदलेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालुन सहकार्य करावे. यापुढील काळात शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे रक्कम देणार असून व कामगारांनाही वेळेत पगार करणार असल्याचेही सांगितले. शेतकरी सभासद, बिगर सभासद, कारखान्याचे हितचिंतक, वाहतुक कंत्राटदार, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांना आमदार मकरंद पाटील व संचालक मंडळाच्यावतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार, कार्याध्यक्ष अजित पिसाळ, उपाध्यक्ष मोहन कदम, विकास कदम, सेक्रेटरी निलेश भोईटे, खजिनदार भरत भोसले, राजु निकम, हणमंत शिंदे, सचिन वाघमळे, सतिश मांढरे, राघवेंद्र डेरे, किरण फाळके, सागर गायकवाड, लक्ष्मण जाधव, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.