बारामती ! पुरातून बाहेर निघाला पण...! सांगलीचा पठ्ठ्या बायकोला भेटलाच...! मुर्टी-मोरगाव रस्त्यावर पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण सुखरुप...! प्रशासनाची मात्र दमछाक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी मोरगाव रस्त्यावर सानिका हाॅटेलच्या येथे मुर्टी गावचे हद्दीतील ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आल्यामुळे काल दि. १९ रोजी रात्री बारा वाजता एक मोटारसायकलस्वार त्याचे मोटारसायकलसह पुराच्या पाण्यात वाहुन गेला होता मात्र पुरातून पोहून बाहेर निघत त्याने रांजणगाव गाठत बायकोला भेटला. 
         सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील युवक सागर अरविंद पाटील वय २९ हा कराड वरून सातारा नीरा मोरगाव मार्गे रांजणगाव येथे कामाला असणाऱ्या प्रिया सागर पाटील यांना दिवाळीसाठी घरी घेऊन जाण्यासाठी जात असताना मोरगाव - मुर्टी या रस्त्यावरील जाधववस्ती शेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक  वाढू लागला होता. याच दरम्यान सागर पाटील हे दुचाकीस्वार ओढ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने "पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आत मध्ये जाऊ नको" असे सांगितले. मात्र सागर पाटील यांनी न ऐकता पुढे गेले असता या हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दिले.
         घटनेची माहीती समजताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीयसह्ययक हनुमंत पाटील, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बीडीओ अनिल बागल, वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून मुर्टी येथील गावातील तरुणांच्या मदतीने या दुचाकीचा व वाहून गेलेल्या सागर पाटीलचा शोध सुरू केला. एका झाडाला अडकलेली त्याची गाडी सापडली मात्र त्याचा तपास लागला नाही. गाडीच्या नंबर वरून पोलिसांनी तपास सुरू केला. तर तो युवक सांगली तालुक्यातील कडेपूर चा असल्याचे समजले. कडेपूरच्या स्थानिक पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क करत त्या युवकाचा फोन केला असता तो पुराच्या पाण्यातून पोहून बाहेर निघाला आणि त्याची बायकोजवळ रांजणगाव येथे पोहोचला असल्याचे समजले. एकीकडे त्याच्या धाडसाचे कौतुक होत असले तरी यामध्ये ग्रामस्थ आणि  प्रशासनाची मात्र दमछाक झाली आहे.   
----------------------
सागर पाटील- कडेपूर सांगली
माझी बायको रांजणगाव येथे कामाला आहे. तिला दिवाळीसाठी आणायला काल सायंकाळी कराड येथील उशिरा निघालो. रात्री बारा वाजता मुर्टीच्या ओढ्यात अचानक पाणी वाढल्याने मी पुराच्या पाण्यात वाहत गेलो. मला पोहता येत होते एका झाडाचा आधार घेत बाहेर निघालो. आणि एका ट्रकला हात करून रांजणगाव येथे पोहचलो.
To Top