सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
साखरवाडी : गणेश पवार
लोणंद ते धर्मपुरी दरम्यान होत असलेल्या पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या कामाचा निष्काळजीपणा प्रवाशाच्या जीवावर उठला असून रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून फलटण ते लोणंद दरम्यान रोज एक तरी अपघात या रस्त्यावर होत आहे आत्तापर्यंत कित्येकांना या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला असून कित्येक जण जायबंदी झाले आहेत.
लोणंद ते धर्मपुरी(49.40किमी)लांबीच्या सुमारे शेकडो कोटी रुपयाचे किमतीच्या राष्ट्रीय महामार्गाचे (NH 985) चौपदरीकरणाचे काम मागील सहा महिन्यापासून सुरू आहे. मात्र ठेकेदाराकडून काम करीत असताना योग्य काळजी घेतली जात नसल्याने आठ महिन्यात या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला आहे. ठेकेदाराने रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जागोजागी रस्त्यालगत मोठ मोठाले चर खोदल्या असून या चर तीन ते चार फूट खोल असून खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक जण रात्रीच्या अंधारात या खड्ड्यात पडून जायबंदी झाले आहेत.
सुरवडी येथे कमिन्स कंपनीच्या समोर रस्त्यावर टाकलेल्या माती मिश्रित खडीमुळे प्रचंड धुरळा उडत असून याचा त्रास वाहनधारकांबरोबरच आजूबाजूच्या रहिवासी लोकांना सुद्धा होत असून रस्त्यालगतच्या घरांवर धुळीचा खच साठला आहे.
चालू कामामध्ये रस्त्याच्या कडेला कोणतेही दिशादर्शक फलक न लावता कुठेही रस्ता दुभाजक फोडून वाहतूक वळवली जात असल्याने समोर च्या वाहनांना अंदाज येत नसल्याने समोरा समोर वाहने धडकून सुद्धा भीषण अपघात याआधी झाले आहेत. ठेकेदाराने तीन ते चार महिन्यापूर्वी खोदलेले खड्डे अजूनही न भरल्याने ही अपघाताची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न प्रवाशांना पडला असून संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभागाने कडक कारवाई करून योग्य काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी प्रवाशांबरोबर नागरिक करीत आहेत.