सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती, पुरंदर, इंदापूर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस या सहाही तालुक्यांना वरदान ठरलेली नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी आणि वीर ही चारही यावर्षीच्या पावसाळ्यात अनेक वेळा भरली. विशेष म्हणजे गेले साडेचार महिने सुरू असलेल्या पावसामुळे या चारही धारणांमधून जवळपास ४० हजार टीएमसी पाणी वाहून गेले आहे. या वाहून गेलेल्या पाण्यात ९.८०० टीएमसी क्षमता असणारे वीर धरण साडेचार वेळा भरले असते.
सन २०१९ मध्ये असाच प्रकारचा पाऊस पडल्याने ऑक्टोबरच्या महिन्यात देखील पाऊस पडत होता. तीन वर्षांनंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे वीर धरणामधून ६६०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीपच न दिल्याने गेल्या दीड महिन्यांपासून धरणांचे दरवाजे अनेक वेळा उचलले गेले. आत्तापर्यंत नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात ११ हजार ७२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात २३ हजार ५०२ मिलिमीटर, वीर धरण पाणलोट क्षेत्रात ९ हजार ४०८ मिलिमीटर तर गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात ३ हजार ६९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.