सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
२६-११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतुलनीय पराक्रम दाखवून अजमल कसाबला जिवंत पकडून दाखवण्याची मोलाची कामगिरी करणाऱ्या जावळी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर १४,वर्षांनंतर मार्गी लागला असून येत्या २६नोव्हेंबर ला तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनादिवशी केडंबे ता. जावली या मूळ गावी स्मारकाचे भूमिपूजन करणार असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
२६/११च्या हल्ल्यात हुतात्मा झालेले तुकाराम ओंबळे यांचे यथोचित स्मारक त्यांच्या मूळ गावी व्हावे यासाठी शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख (शिंदे गट) एकनाथ ओंबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात मंत्री देसाई यांची भेट घेऊन हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता.यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा आठ दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले. येत्या २६नोव्हेंबर ला ओंबळे यांच्या स्मृतिदिनादिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई हे स्वतः स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी केडंबे येथे येणार आहेत.
हुतात्मा ओंबळे यांचे यथोचित स्मारक होण्यासाठी मंत्री देसाई यांनी राज्य सरकार लागेल एवढा निधी देईल असे आश्वासनही दिले. गेल्या १४वर्षांपासून हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजीची भावना होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला असून यासाठी गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून दीड महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्मारकासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.स्मारकाच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार शासकीय अधिकारी यांच्यासोबत ४ते ५वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने भरीव निधी या स्मारकासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासित केले असून लवकरच जावळी तालुक्याच्या सुपुत्राचे भव्य स्मारक केडंबे येथे उभे राहणार आहे. या स्मारकामुळे हुतात्मा ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष युवीपिढीसमोर दीपस्तंभ म्हणून राहील .राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार .लवकरच या स्मारकाच्या कामास प्रारंभ होईल अशी माहिती शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिली