सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
खंडाळा व किसन वीर हे दोन्ही कारखाने आर्थिक अडचणीत असताना आमदार मकरंद पाटील यांनी जे शिवधनुष्य उचलले त्यास सभासदांनीही समर्थपणे साथ दिली. खंडाळा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार असल्याचा जनतेला जो शब्द दिला होता, त्याची शब्दपुर्ती झाल्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने शुभ आहे. नविन कारखाना काढणं सोप आहे, परंतु आर्थिक अडचणीत आलेले कारखाने बाहेर काढण्याचा निर्णय घेणं हा खुप धाडसाचा निर्णय आहे. तो निर्णय कोणीही घेतला नसता तो आपण घेतला त्याबद्दल आपल्या धाडसाचं कौतुक करावं लागेल, असे गौरवोदगार विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले.
किसन वीर खंडाळा साखर उद्योगाचा गळित हंगाम शुभारंभ विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व राज्याचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. आमदार रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले की, खंडाळा कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभ माझ्या हस्ते झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. मागील संचालक मंडळाने काय केले याकडे न पाहता त्यांच्यातून फक्त घडे घ्यायचे व त्यातुन पुढे जायचे असते. आमदार मकरंद आबा पाटील यांनी जर किसन वीर व खंडाळा कारखान्याची निवडणुक लढविली नसती तर आज कारखान्यांचे लिलाव झाल्याशिवाय राहिले नसते. आज कारखाना सुरू झाला आहे त्यामुळे आपण पहिली परिक्षा उत्तीर्ण झालेला आहात. अजुन बऱ्याच परिक्षांना सामोरे जायचे आहे. ज्यांनी कारखाने अडचणीत आणले त्यांना त्याचे काहीही घेणं-देणं नाही हे सर्व देणं आहे ते विद्यमान व्यवस्थापनाला द्यावं लागतं. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी व कामगार सुखात जगला पाहिजे. आपल्यामध्ये भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी असली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या अडचणींना सामोरे जाता आले पाहिजे. सभासदांनीही कारखान्याचे भाग भांडवल वाढविण्यासाठी मदत केली पाहिजे जेणेकरून कारखान्याचे नेटवर्थ जे मायनस आहे ते प्लस होण्यास मदत होईल. सभासदांनीही आमदार मकरंद आबा पाटील यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, एका नव्या युगाचा नवा शुभारंभ आज खंडाळ्यामध्ये संपन्न होत आहे. योग असावा लागतो, दिवाळीचा शुभमुहूर्त जवळ येतोय त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छाही आपणांस देतो. आमदार मकरंदआबा व नितीनकाका तसेच सर्व संचालक मंडळाचे कौतुक करतो की, सध्याच्या युगामध्ये आव्हान स्विकारणे सोपे नाही, ते राजकारणातले असो कि विकासाचा असो कि उद्योग धंद्याचा असो रोज बदलणाऱ्या पॉलिसीला, धोरणांना आव्हान म्हणून स्विकारण्याची तयारी ज्याच्या मनगटामध्ये असते त्याला जनतेचा जनाधार आवश्यक असतो आणि त्यांचा जनाधार ज्याच्या पाठीमागे असल्यामुळेच किसन वीर व खंडाळा कारखान्यामध्ये इतिहास घडला गेला व दोन्ही कारखाने आमदार मकरंदआबा पाटलांच्या व्यवस्थापनाच्या हाती आले. मागील वर्षी याच दिवशी खंडाळ्याचे मतदान झाले व याच दिवशी गळित हंगामाचा शुभारंभ होत आहे. आपणांला जो शब्द दिलेला होता तो शब्द आज खऱ्या अर्थाने पुर्ण होत आहे त्यामुळे आपल्याला दिलेल्या शब्दाची पुर्ती होत असल्याचा विशेष आनंद यानिमित्ताने होत आहे. मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला पावसाने दिलेली हजेरी हा शुभसंकेत आहे. मकरंद आबांनी किसन वीर व खंडाळा कारखान्याकरिता आपली आमदारकीचाही विचार केला नाही त्यांच्यावर आपणही तेवढाच विश्वास टाकावा. किसन वीर व खंडाळ्याच्या सभासदांनीही आपला चांगल्याप्रतीचा ऊस गाळपासाठी घालण्याचे आवाहनही यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
खंडाळा कारखान्याचा सर्वसामान्य सभासद शेतकरी ज्या क्षणाची अतुरतेने वाट पाहत होता तो दिवस आज प्रत्यक्षात आल्यामुळे व आम्ही दिलेला शब्द खरा केल्यामुळे आज खऱ्या अर्थाने शब्दपुर्ती पुर्ण केल्याचा आनंद होत असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले व पुढे म्हणाले की, खंडाळा कारखाना हा मागील सात वर्षांपुर्वी सुरू झाला परंतु मागील व्यवस्थापनाच्या भोंगळ व भ्रष्ट कारभारामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला. फक्त खंडाळाच नव्हे तर मातृसंस्था असलेला किसन वीर व पर्यायाने प्रतापगड कारखानाही अडचणीत आला. मागील हंगामात शेतकऱ्यांची जी पिळवणुक झाली जो मनस्ताप झाला तो खुपच त्रासिक होता. घरचा कारखाना असूनही ऊसासाठी दुसऱ्याच्या दारात जाणे किती वाईट असते ही परिस्थिती खुप वाईट होती. कारखाना चुकीच्या व्यवस्थापनाच्या हाती गेल्यावर काय होते त्याचे हे प्रत्यतर होते. आमदारकीपणाला लावुन कारखानदारीचे आव्हान स्विकारले. कारखाना सुरू झाला म्हणुन अडचणी संपल्या असा होत नाही. तर आपण जे भाग भांडवल वाढविण्याचे जे उद्दिष्ठ ठेवले आहे ते पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकाधिक भाग भांडवल वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आज खंडाळा सुरू झालेला आहे महिनाअखेरपर्यंत किसन वीरही सुरू होणार आहे. दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालविणार असून त्यासाठीची आवश्यक असणारी तोडणी यंत्रणेचे करारही पुर्ण झालेले आहेत. त्यामुळे आपण आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती पुर्ण केल्याचा आनंद होत आहे. शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव देणार असून नोंद केलेला ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, नितीन भुरगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकऱ्यांनी भाग भांडवल वाढविण्याबाबत व आपला संपुर्ण ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर चंद्रकांत ढमाळ यांनी आभार मानले. यावेळी दोन्ही कारखान्याचे संचालक, जिल्ह्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.