सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
कोरेगाव तालुक्यातील सोनके गावच्या यात्रेला बावधन गावचे प्रकाश भोसले आणि बाळू शिंदे हे दुचाकी वरून गेले होते.परत येताना सुरूर गावच्या हद्दीत पुलावरून दुचाकी घसरून खाली पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बावधन गावचे प्रकाश निवृत्ती भोसले आणि बाळासाहेब महादू शिंदे हे दोघे मित्र त्यांच्या पाहुण्याच्या सोनके गावच्या यात्रेला गेले होते. यात्रा करून पुन्हा मंगळवारी सायंकाळी बावधनला दुचाकीवरून निघाले होते. सुरूर गावच्या हद्दीत पोहचल्यावर ओढ्याच्या जवळ येताच गाडी घसरली. ती वेगात असल्याने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सरकत जाऊन पुलावरून खाली जाऊन पडली. गाडी खाली पडल्याने मोठा आवाज झाला. काही वाहन धारकांना आलेल्या आवाजाने वाहने थांबवून पाहिले असता ओढ्यात पाण्यात दुचाकी अंधारात दिसत होती. याची माहिती भुईंज पोलिसांना दिली. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांना सूचना देताच त्यांच्यासह हवालदार मुंगसे, तोरडमल, धायगुडे आणि महामार्ग पोलीस पोहचले. मृतदेह बाहेर काढुन कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.