वाई ! ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात होणार : शंभर खाटांसह आरोग्य तपासणीसाठी आधुनिक यंत्रणा बसवणार : मा. आमदार मदन भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाईच्या ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात करुन नवी सुसज्ज इमारत उभारुन त्यामध्ये अत्याधुनिक तपासणी व उपचार सुविधा निर्माण करण्यासोबत वाईच्या पोलिस वसाहतीत अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी नवी घरे बांधण्याच्या कामाला उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता देत संबंधितांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती माजी आमदार मदनदादा भोसले यांनी दिली.
         मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ना. फडणवीस यांची भेट घेवून विविध विकासकामांचे निवेदन दिले. त्यावेळी या दोन महत्वपूर्ण कामांसह इतरही काही कामांबाबत ना. फडणवीस यांनी तत्परता दाखवली. याबाबत अधिक माहिती देताना मदनदादा म्हणाले, वाई शहर परिसरातील संपूर्ण ग्रामीण भाग भौगोलिकदृष्ट्या वाई शहराशीच जोडला गेला आहे. वाढते आजार, वाढती रुग्ण संख्या व सर्वसामान्य जनतेना न परवडणार्‍या खासगी वैद्यकीय सेवा लक्षात घेता वाईतील ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर जिल्हा रुग्णालयात होवून नवी भव्य व सुसज्ज इमारत उभारली जावी, त्या 100 खाटांच्या रुग्णालयात सुसज्ज व अत्याधुनिक अशी सर्वरोग तपासणी, शस्त्रक्रीया व उपचार यंत्रणा उभारली जावी. सध्याच्या ग्रामीण रुग्णालयाची जागा अवघी सुमारे 11 गुुंठे आहे. उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी पाच एकर जागा वाई शहरातच बसस्थानकापासून जवळ शासकीय विश्रामगृह परिसरात धोम पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध होवू शकते. रहदारीच्या दृष्टीनेही ही जागा सोयीची असून ही जागा त्वरीत उपलब्ध करुन कामाला सुरुवात करावी, अशी आग्रहपूर्वक मागणी करण्यात आली. 
त्याचसोबत वाई पोलिस स्टेशन 1939 साली सुरु झाले. या ठिकाणी असणार्‍या पोलिस वसाहतीची अवस्था भीषण म्हणावी इतकी बिकट आहे. बहुतेक सर्व निवासस्थानांची पडझड झाली असून ती राहण्याच्या लायकीची नाहीत. वाई पोलिस ठाण्यासाठी 4 अधिकारी व 70 कर्मचारी अशी पदसंख्या मंजुर आहे. या संख्येत वाढ होणे अपेक्षित असताना मंजुर पदेही पूर्ण क्षमतेने उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुरेशी कर्मचारी संख्या उपलब्ध करतानाच या वसाहतीत पोलिसांसाठी परिपूर्ण व पुरेशा क्षेत्रफळाची नवीन घरे त्वरीत बांधली जावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी इतरही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर ना. देवेंद्र फडणवीस यांनी या कामांना तत्वत: मंजुरी देत संबंधितांना त्वरीत कार्यवाहीचे आदेश दिले. 
यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस यशवंत लेले, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाई शहराध्यक्ष राकेश फुले, भाजपा नेते अनिल जाधव, नाना कायंगुडे, केतन भोसले, विजय ढेकाणे, संतोष जमदाडे, सचिन जमदाडे, चंद्रकांत माताडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
. . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . .. . . . .. . . ..
श्रेय विद्यमान युती शासनाचेच : ना. फडणवीस
यावेळी वाई येथे जिल्हा दिवाणी न्यायालय सुरु होण्यासाठी पदभरतीची प्रक्रिया सुरु केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे शिष्ट मंडळाने आभार मानले. त्यावर ना. फडणवीस यांनी, या कामाच्या श्रेयाबाबत झालेला प्रकार आपल्या कानावर आला असून आपण त्याची नोंद घेतली असून या कामाचा पाठपुरावा सन 2019 पासून मदनदादा हेच माझ्याकडे करत होते आणि या कामाचे श्रेय विद्यमान युती शासनाचेच आहे. आपले सरकार आल्यानंतर कसे काम होते ते आपण दाखवून देत असून यापुढील काळातही तुम्ही सुचवलेली कामे मार्गी लावण्याबात काळजी करु नये, असे स्पष्टपणे सांगिलते.
To Top