सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना गेल्या तीन ते चार वर्षात नियोजनशुन्य कारभारामुळे आर्थिक अडचणीत आलेला होता. या कालावधीमध्ये कारखान्याच्या बाहेर व आतील अवस्थेकडे मागील व्यवस्थापनाने लक्ष न दिल्यामुळे झालेली दुरावस्था, ऑफिसबाहेरील परिसरात वाढलेली झाडे झुडपे यामुळे कारखाना परिसरात गवताचे साम्राज्य पसरलेले होते. यामुळे कामगारांनाही काम करणे जिकीरीचे झालेले होते. त्यामुळे सर्व कामगारांनी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांना ही खंत बोलून दाखविली व आम्ही सर्व कामगार स्वयंस्फुर्तीने कारखाना परिसर श्रमदानाने साफ करून कारखाना परिसर स्वच्छ करण्याची इच्छा व्यक्त केली. कामगारांच्या या इच्छेचा मान राखत उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी या कामात आम्ही सर्व संचालकही आपल्या बरोबर या कामात खांद्याला खांद्या लावून काम करण्याचे सांगितले.
शुक्रवार (दि. २८) सकाळी नऊ वाजता कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संदिप चव्हाण, सचिन जाधव, प्रकाश धुरगुडे, रामदास इथापे, संजय कांबळे व कार्यकारी संचालक अशोक शिंदे, परिसरातील कार्यकर्ते यांच्यासमवेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागापासून सुरूवात करीत जुन्या शेती ऑफिससमोरील जागा, ऊस विकास, कारखाना मेन गेट, किकली गेट, किसन वीर पुतळा परिसर, गव्हाण परिसर, को जन परिसरातील सर्व ठिकाणचा परिसर झाडा-झुडपे, वेल व गवतानी झाकला गेलेला होता. संचालकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे या सर्व परिसराने आज बऱ्याच वर्षांनी मोकळा श्वास घेतला असल्याची जाणीव झाली. या सर्व परिसरातून जवळपास २० ते २२ ट्रॉली भरून झाडे-झुडपे, वेल व गवताची विल्हेवाट लावण्यात आली.
या श्रमदानानंतर झालेल्या मोकळ्या जागेत छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले की, ज्या प्रमाणे किसन वीरचा शेतकरी व कर्मचाऱ्यांसारखे सहनशीलता कोठेही पहावयास मिळणार नाही. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्याबाबतीतही कामगार परिपुर्ण असल्याचे पाहुन आम्हालाही समाधान वाटत आहे. कारखान्यातील अंतर्गत कामेही संपत आलेली असून शनिवारी किसन वीर कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व सौ. अर्चनाताई मकरंद पाटील या उभयतांच्या हस्ते होत आहे. याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने कामगारांनी कारखाना स्वच्छ करून या श्रमदानातून जी स्वच्छतारूपी अनोखी भेट दिलेली ही कौतुकास्पद असल्याची भावनाही यावेळी श्री. शिंदे यांनी बोलून दाखविली.