सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उद्या शनिवार (दि. २९) दुपारी ३ वाजता वाई -खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना पाटील यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नुकताच खंडाळा कारखान्याचा गळित हंगामास सुरूवात झालेली आहे. किसन वीर कारखान्याची अंतर्गत कामे संपलेली असून दोन्ही कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणाही कारखाना साईटवर आलेली आहे. शेतकरी सभासदांनी आमदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या व्यवस्थापनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवित खंडाळा कारखाना सुरू केलेला असून किसन वीर कारखानाही लवकरच सुरू करणार असल्याचेही यावेळी श्री. शिंदे यांनी सांगितले.
या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे, कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.