सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामाला ब्रेक लागला असून परतीच्या पावसाने दाणादाण उडवल्याने साखर कारखान्यांना ऊसाचे गाळप बंद करावे लागले आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू करण्याचा मुहूर्त चुकल्याने यावर्षीचा ऊस गाळप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी राज्य शासनाने १५ ऑक्टोबर ही तारीख दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी १५ तारखेलाच कारखाने सुरू केले मात्र दि १२ ते १८ दरम्यान पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना ऊसाचे गाळप बंद ठेवावे लागले. कारखाने सुरू करण्याच्या दृष्टीने कारखानदारांनी अंतर्गत कामांची पूर्तता करत ऊसतोडणी यंत्रणांशी करार पूर्ण केले आहेत. सोमेश्वरसह जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांवर काही ऊसतोडणी मजूर देखील दाखल होऊन दि १५ ,रोजी उसतोडणी सुरुवात होऊन कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे उसामधून कमरेएवढे पाणी साठत असल्याने उसाच्या तोडी बंद ठेवाव्या लागल्या आहेत.
त्यातच साखर कारखाना स्थळावर केवळ ५० टक्केच ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. परिणामी उसआभावी कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी साखर कारखाने १ ऑक्टोबरलाच सुरू होणे अपेक्षित असताना शासनाने १५ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली. १० ऑक्टोबर पासूनच ऊस तोडणी कामगार कारखान्यांवर आले देखील मात्र त्यांची संख्या तोकडी होती. त्यातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ५० टक्केच्या वर ऊसतोडणी मजूर गावकडेच अडकून पडले. त्यात दिवाळी सुरू झाली. आता ऊसतोडणी कामगार कारखाना स्थळावर दाखल होण्यास सुरुवात झाली असून १ नोव्हेंबर नंतरच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.
--------