सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ दि.०३.१०.२०२२ रोजी केला. पुरूषोत्तम जगताप, चेअरमन, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर यांचे हस्ते सांगली जिल्हयातील डिग्रज गावचे प्रगतशील शेतकरी राहुल कुबेर यांना ऊस बेणेमळ्याची पहिली मोळी देवून बियाणे विक्री व वाटपाला सुरूवात केली. त्यावेळी शैलेश रासकर, संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर, विविध जिल्हयातील प्रगतशील शेतकरी आणि पाडेगावचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
पाडेगाव संशोधन केंद्राने २५ हेक्टर क्षेत्रावर ऊसाच्या बियाणे मळे तयार केले आहेत. ऊसाच्या मुलभूत बियाण्यापासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकऱ्यांना पुरवठा करता येईल. प्रामुख्याने को ८६०३२, फुले २६५. फुले १०००१. फुले ०९०५७, को ११०१५, फुले ११०८२ या वाणांचे बियाणे उपलब्ध होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये को ८६०३२ आणि फुले २६५ या वाणाचे बियाणे मिळेल. डिसेंबर महिन्यात उरलेल्या वाणांचे बियाणे मिळेल. पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेला आणि सुरू आणि पूर्वहंगामसाठी शिफारस केलेला फुले ११०८२ हा लवकर तयार होणार वाण आहे. कमी कालावधीमध्ये १० महिन्यातच साखर तयार होत असल्याने गळीताच्या सुरूवातीला अधिक साखर उताऱ्यासाठी हा वाण फायदेशीर आहे. चालू वर्षी फुले ऊस १५०१२ हा वाण शिफारशीत करण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याची विक्री डिसेंबर पासून सुरू होईल, हा वाण को ८६०३२ पेक्षा अधिक ऊस आणि साखर उतारा देणारा असून फुले २६५ पेक्षा १ युनिटने साखर उतारा मिळणार आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली लागवडीबरोबर खोडव्यासाठी सुध्दा याची शिफारस करण्यात येत आहे. चालू वर्षी साधारणपणे १.२५ कोटी दोन डोळा टिपरी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहे. याची लागवड एक डोळा पध्दतीने केल्यास १२५० हेक्टरवर करता येईल. त्यानंतर पहिल्या वर्षी हे बियाणे २५ हजार हेक्टर व दुसन्या वर्षी ५ लाख क्षेत्रावर वापरता येईल. अशा प्रकारे दरवर्षी प्रत्येक कारखान्याला ३० टक्के क्षेत्रावर नवीन बेणे वापरता येईल. बेणे बदलामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. सर्व साखर कारखाने आणि शेतकरी यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बियाणे वापरण्याचे आवाहन डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ञ, ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केले आहे. १ गुंठा लागवडीसाठी दोन डोळयाची २५० टिपरी लागतात. त्याच्या माध्यमातून पुढील वर्षी १२५० ऊस तयार होतील व दोन डोळयाची २५००० टिपरी उपलब्ध होतील. अशा प्रकारे १ गुंठे प्लॉटमधून १ हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येईल. बियाणे ऊसाच्या दोन
डोळयाच्या १००० टिपरीचा तोडणी आणि भरणीसह विक्रीचा दर रु. १७५०/- असा आहे. तसेच नवीन वाण फुले ११०८२ आणि पीडीएन १५०१२ या वाणाचा १००० टिपरीचा विक्रीचा दर रू. ५१५०/- असा आहे. ऊस मोळयाच्या माध्यामातून बेण्याची विक्री होईल. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र शेतकरी आणि साखर कारखाने यांच्या प्रगतीकरीता सतत प्रयत्नशील आहे. या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या ऊस वाणांच्या बेण्याचा सर्व शेतकऱ्यांनी नवीन लागवडीसाठी उपयोग करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले आहे. या केंद्रातून बियाणे उचलण्यासाठी बियाणे विक्री अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे मो.८२७५४७३१९१ व डॉ. दतात्रय थोरवे मो. ९८८१६४४५७३ यांचेशी कार्यालयीन वेळेत सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा.