सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या अस्तरीकरणाविरोधात काही लोक जनतेची दिशाभूल करत असून नौटंकी करण्याचे काम करत आहेत. मध्यंतरी आपल्या कालव्याचे पाणी दुसरीकडे गेले त्यावेळी हे कुठे गेले होते. त्यावेळी ते गप्प का बसले होते अशा शब्दात नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध करणारांचा समाचार अजित पवार यांनी घेतला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगाम व गव्हाण पूजन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी आमदार संजय जगताप,सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सचिन सातव, नीता फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, सद्याच्या सुरू असलेल्या राज्यातील गोंधळामुळे कुठलं सरकार किती दिवस टिकेल हे अधिकाऱ्यांच समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू असून याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे. नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले, काही लोक याबाबत दिशाभूल करत असून नौटंकी करण्याचे काम करत आहेत. मध्यंतरी आपल्या कालव्याचे पाणी दुसरीकडे गेले त्यावेळी हे कुठे गेले होते. त्यावेळी ते गप्प का बसले. ज्या ठिकाणी कालव्याला वळणे आहेत अशा ठिकाणी आपण प्लास्टिक कागद न टाकता अस्तरीकरण करणार आहे. काही लोक याबाबत देखील चुकीची माहिती पसरवत आहेत.