सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
एकविसाव्या शतकातही संगणक युगातही अजूनही मुलगी जन्माला आली की निराशा पसरते असेच दुर्दैवी चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र वाणेवाडी (ता. बारामती) येथील डॉक्टर रवींद्र सावंत व सुरेखा सावंत या दाम्पत्यांनी मात्र ढोल ताशांच्या गजरात, पणत्यांची व फुलांची आरास मांडून आणि फुलांच्या पायघड्या अंथरूण नातीचे स्वागत केले.
प्रसिद्ध उद्योजक डॉ. रवींद्र सावंत हे जुनाट रूढी परंपरांना कवटाळून न बसता शास्त्रीय विचार मानणारे आहेत. तोच विचार त्यांनी स्वतःच्या घरात झालेल्या स्त्री जन्माबाबत दाखवून दिला आहे. त्यांचा मुलगा किरण, सून डॉ. राधा यांना तीन महिन्यापूर्वी कन्यारत्न झाले तेंव्हाच सावंत कुटुंबियांनी पेढे वाटून आनंद सोहळा साजरा केला. नातीचे नामकरणही उत्साहात जिजाऊ असे केले. बाळाच्या निमित्ताने सूनबाई माहेरी होत्या. काल सायंकाळी वसुबारसेच्याच मुहूर्तावर सुनेचा बाळासह गृहप्रवेश घेण्याचे निश्चित केले. काल सायंकाळी सूनबाईचे जिजाऊला घेऊन घरासमोर आगमन झाल्यावर ढोल ताशांच्या गजरात स्वागत पार पडले. पुष्पवृष्टी करण्यात आली. वाणेवाडीच्या दत्तवाडी वस्तीतील सर्व स्त्रियांना निमंत्रण दिले।होते. सुरेखा सावंत यांनी महिलांसह जिजाऊची ओवाळणी केली. फुलांच्या पायघड्यावरून वाजत गाजत घरात प्रवेशित करण्यात आले. मुलगी झाली की बर्फी आणि मुलाला पेढा वाटतात. सावंत कुटुंबीयांनी सगळीकडे पेढे वाटून आनंद साजरा केला. यानिमित्ताने परिसरात स्त्री जन्माच्या स्वागताची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. सावंत म्हणाले, मुलगा मुलगी असे न पाहता घरात आनंद घेऊन आलेले मूल म्हणून बाळाचे स्वागत आम्ही केले. मुलगा मुलगी हा भेद आम्हाला मान्यच नाही. लोकांमध्येही तोच विचार जावा अशीही इच्छा आहे.