सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील अंधश्रध्दा निर्मूलन समिती व भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या वतीने सात दिवस राबविण्यात आलेल्या 'फटाके नको पुस्तके हवी' या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मोहिमेच्या आजच्या समारोपाला येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातही पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने बाळकृष्ण भापकर व प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जयंतीनिमित्त करंजेपूल (ता. बारामती) येथे सात दिवस फटाके नको पुस्तके हवी ही मोहिम राबविणअयात आली. या मोहिमेअंतर्गत भाज्ञाविसचे राजू बडदे यांच्या पुढाकाराने विविध विज्ञानवादी, परिवर्तनवादी विचारांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन 'माढा'चे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण भापकर, मुख्याध्यापक संदीप जगताप, 'अंनिस'चे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ नेवसे, अतुल शिंगटे, राजू बालगुडे, संतोष शेंडकर उपस्थित होते.
सप्ताहाचा समारोप आज दाभोळकरांच्या जन्मदिनी झाला. यानिमित्त काकडे महाविद्यालयात आयोजित केलेल्या विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजू बडदे, डॉ. प्रवीण ताटे, डॉ. संजू जाधव, डॉ. नारायण राजूरवार, ग्रंथपाल प्रा. किरण मोरे, प्रा. आऱ. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. महाविद्यालयीन तरूणाईने अत्यंत कुतुहलाने पुस्तके हाताळली. दाभोळकरांच्या पुस्तकांना त्यांनी विशेष पसंती दर्शविली. यानिमित्ताने 'अंनिस'चे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण भापकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'तरूणाईस प्रश्न पडले पाहिजेत. कुठलीही गोष्ट अंधपणे न स्वीकारता चिकीत्सा केली पाहिजे. ते शिकण्यासाठी सातत्याने विज्ञानवादी विचारांची पुस्तके वाचली पाहिजेत.' असे ते म्हणाले. डॉ. वायदंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राजक्ता पवार यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. जी. आर. दरेकर यांनी आभार मानले.
COMMENTS