सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई, दौलतराव पिसाळ
वाई शहरात ठिकठिकाणी पक्के डांबरी रस्ते यंत्राच्या सहाय्याने खोदकाम करून जिओ इंटरनेट फायबर टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र सदर फायबर खोदकामांतील त्रूटींमुळे वाईकर नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे, अशी तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी वाई नगरपरिषदेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनांत म्हटले आहे की, वाई शहरांत गेले अनेक दिवस शहरांतील चांगल्या डांबरी रस्त्यांवर ठिकठिकाणी जिओ इंटरनेट फायबर केबल रस्त्याखाली गाडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आधुनिक यंत्र आणलेले असून त्याव्दारे डांबर रस्त्याला केबलच्या मापाचा चर काढला जात आहे. सदरचा चर काढत असताना तेथील यंत्राचा मोठा आवाज होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या कानठाळ्या बसत आहेत. तर सदरचे यंत्र माती व मुरूम डांबर बाहेर फेकत असल्याने वाई शहरांत मोठ्या प्रमाणात वायू व ध्वनी प्रदूषण होत आहे. त्यामुळे शहरांतील अनेक लोक आजारी पडले आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होत असून खोकला मोठ्या प्रमाणात येत आहे.
कंपनीने ज्या भागांत काम केले आहे. तेथे माती व खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त विखरून पडली आहे. त्यावरून दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. रस्त्यावरील चर व्यवस्थित बुजवला तरी माती व खडी तेथेच रस्त्यावर टाकून दिली जात आहे. नगरपरिषदेने संबंधित ठेकेदार यांना रस्त्यावरील खडी व मातीची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे लेखी आदेश देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी धूळ उडेल, अशी रचना यंत्रामध्ये केलेली असली पाहिजे. तसेच कंपनीने वापरलेला रस्ता पूर्वीप्रमाणे व्यवस्थित स्वच्छ करून देणे आवश्यक आहे. रस्त्यावर पुन्हा खड्डे न पाडता रस्ता स्वच्छ ठेवणे, या बाबींकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास सदरचे बंद पाडून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर शहर अध्यक्ष गणेश जाधव, सुरेश पोपळे, विवेक भोसले, किरण खामकर, स्वप्निल भिलारे, आशिष पाटणे, विशाल भिलारे, गौतम यादव, नितीन पानसे, सोमनाथ अवसरे, रुपेश तावरे, संतोष सकुंडे आदींच्या सह्या असून त्यांच्या शिष्टमंडळाने वाई नगरपरिषदेत मुख्याधिकारी किरण मोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.