बारामती तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतींची रंगणार रणधुमाळी : गावागावात होणार 'काटे की टक्कर'

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
दिवाळीची धामधूम थांबताच बारामती तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीची  निवडणूक रणधुमाळी सुरू झाली  आहे.
         दिवाळीपूर्वीच अनेक इच्छुक उमेदवार, पॅनेल प्रमुख व तालुक्यातील  पदाधिकाऱ्यांनी जनतेला खुश करण्यासाठी गिफ्ट वाटप जोरात सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासक आहे. याशिवाय डिसेंबर २०२१ ते २०२२ मधील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक आज दि ९ रोजी जाहीर झाली आहे. या अगोदर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक आणि पुर्वी जाहीर झालेले आरक्षण जैसे थे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच दोन पॅनेल मध्ये जोरदार टक्कर झालेली पहायला मिळते. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी दोन्हीही गटाकडून दावे- प्रतिदावे केले जातात मात्र विकासकामावर मात्र कोणीही बोलायला तयार होत नाही. यातून सर्वसामान्यांची कामे होत नसल्याने मतदार राजा पर्यायाच्या शोधात असणार आहे. 
         बारामती तालुक्यातील जळगाव कप, भिलारवाडी, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरुम, गडदरवाडी, सोरटेवाडी, पणदरे, कुरणेवाडी, सोनकसवाडी, मोरगाव, लोणी भापकर, मासाळवाडी, पळशी आणि काऱ्हाटी या ग्रामपंचायतीची निवडणूक दि १८ पासून होणार आहे. इच्छुकांनी मतदार राजाला साकडे घालायला सुरुवात केली असून चौकाचौकात ग्रामपंचायत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतीची थकित घरपट्टी व पाणीपट्टी भरून अनेक तरूण उमेदवारांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायतींना करोडो रुपयांचा विकासनिधी दिला आहे मात्र अनेक कामात भ्रष्टाचार तर अनेक ठिकाणी निकृष्ट कामे झाली आहेत. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही गप्प असल्याने त्यांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषता बागायती पट्यातील ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणार असून जनता मात्र यात भरडली जात आहे. 
         अनेक तरुण इच्छुक असल्याने ते ज्येष्ठांचा मान राखतात का त्यांना विरोध करून उमेदवारी अर्ज भरले जाणार का?  हे दि १८ ला  स्पष्ट होणार आहे. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये चुका आढळून आल्या आहेत तर नव मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली नाहीत. स्थानिक ठेकेदारांना गावातील कामे दिल्याने विकासकामांचा दर्जा राखला गेला नसल्याचे मागील पाच वर्षात झालेल्या कामावरून स्पष्ट झाले आहे. निवडणूकीत याचा जाब जनतेला विचारवा लागणार आहे तरच पुढील कामे दर्जेदार होतील अन्यथा ठेकेदार मलईपासून खावून मोठे होणार आणि जनता मात्र यात भरडली जाणार आहे.
To Top