बारामती ! हातातोंडाला आलेलं उसाचं पिकं... वीज कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमुळं जळालं...! मगरवाडी येथे चार शेतकऱ्यांचा १२ एकर ऊस जळून लाखोंचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मगरवाडी  (ता. बारामती ) येथील सोरटे व शेंडकर कुटुंबातील चार शेतकऱ्यांचा बारा एकर खोडवा ऊस वीजकंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधून  ठिणग्या उडून निर्माण झालेल्या आगीत जळीत झाला. चारही शेतकऱ्यांचे ठिबक संचदेखील जळून खाक झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे एकरी दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
मगरवाडी येथे आज दुपारी एकच्या दरम्यान शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून स्पार्किंगच्या ठिणग्या उडाल्या आणि फड पेटत गेला. दुपारची वेळ असल्याने ती आग झपाट्याने पागली आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आजूबाजूचे फडही आगीत जळले. यामध्ये सायली संग्राम सोरटे यांचा दोन एकर, अजित जालिंदर सोरटे यांचा चार एकर व देवेंद्र संग्राम सोरटे यांचा चार एकर व रवींद्र पंढरीनाथ शेंडकर यांचा दोन एकर ऊस जळला. चारही शेतकऱ्यांचा खोडवा ऊस होता आणि तो चार महिन्यानी तुटून जाणार होता. हे फड मागील वर्षी एकरी 100 टन बसला होता. वेळेआधी तुटणार असल्याने एकरी 25 ते 30 टन फटका बसणार आहे. तसेच चारही शेतकऱ्यांनी एकरी पन्नास साठ हजार खर्चून ठिबक संच बसविले होते. तेही जळून गेले. त्यामुळे एकरी सव्वा ते दीड लाखांची तोशिस बसणार आहे.
शाखा अभियंता किशोर कहार यांनी, ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूजमधून ठीणग्या उडल्याने आग लागली. याबाबत अहवाल वरिष्ठाना पाठवत आहे. दरम्यान तलाठी दादासाहेब आगम यांनीही पंचनामा केला आहे.
शेतकरी अजित सोरटे म्हणाले, सलग तिसऱ्या वर्षी वीजकंपनीकडून आमचा ऊस जळला आहे. ट्रान्सफॉर्मर मधून सारख्या ठीणग्या उडत असायच्या. एकदा लागलेली आग विझवली होती. एकरी दीड लाखाला मेलो आहोत. कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.
To Top