सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, त्या निमित्ताने आनंद व्यक्त करण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते, अशी कथा सांगितली जाते. या दिवशी दीपोत्सव करण्याची प्रथा राज्यातील अनेक ठिकाणी पाळली जाते. विशेष करून शिवमंदिरांमध्ये दीपोत्सव करण्याचे प्रमाण अधिक आहे. दक्षिणकाशी वाईमध्ये कृष्णां नदीकाठी बांधलेल्या फरसबंध घाटांवर, नदीकाठच्या मंदिरामध्ये दिवे लावून आणि प्रत्यक्ष कृष्णेच्या पात्रात दिवे सोडून हा दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो त्या दीपोत्सवाबद्दल......
दक्षिणकाशी वाईला उत्सव प्रिय नगरी म्हणून ओळखले जाते. इथला कृष्णा नदीचा म्हणजे पाण्याची पूजा करण्याचा उत्सव तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . या कृष्णाबाई संस्थानांच्या वतीने वाईतील सात घाटांवर विशेषतः शिव मंदिरांमध्ये शिवाची पूजा करण्यासाठी असंख्य पणत्या, दीपमाळा उजळल्या जातात. हा देखावा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. त्रिपुरा पौर्णिमेच्या सायंकाळी अनेक लोक उत्साहाने स्वतः दीप घेऊन येतात आणि ते प्रज्वलित करतात. या कार्यात काही गणेश मंडळे, काही संस्था,तरुण आणि वृद्धही उत्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवतात , वाईकर मंडळींनी जपून ठेवलेल्या जुन्या दगडी पणत्या आणि वाईच्या कुंभार वाड्यातील असंख्य कुंभारांनी घडवलेल्या मातीच्या पणत्या जेव्हा लक्ष लक्ष ज्योती उजळतात तेव्हा हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने एक लोकोत्सव होऊन जातो.
सर्व घाट, नदीकाठ आणि नदी काठावरील मंदिरे या लखलख चंदेरी प्रकाशात न्हावून निघतात. त्यावेळचे सौंदर्य अवर्णनीय असते . दिव्यांच्या नैसर्गिक प्रकाशात ही तेजोमयी मंदिरे पाहणे ही एक वेगळीच अनुभूती असते. याचबरोबर वाईच्या कृष्णा नदीच्या पात्रात दिवे सोडले जातात हे दृश्य तर अनुपम सौंदर्याचा एक अनोखा नजारा असतो. जणूकाही कृष्णा नदीने ठिपक्यांची चंद्रकळा नेसली आहे असे ते दृश्य दिसते. आकाशीचे तारे, चांदण्या जणू नदीत तरंगत आहेत असा भास होतो आणि सगळा आसमंत विलोभनीय होतो हा सर्व अभूतपूर्व नजारा पाहण्यासाठी सर्व वाईकर यावेळी घाटावर गर्दी करतात ,आवर्जून उपस्थित राहतात.
त्याचबरोबर वाई मध्ये आणखी एक आगळीवेगळे परंपरा आहे .वाईच्या गणपती मंदिराच्या घाटावरून काही मुले दिवाळीतील बाण आकाशात सोडतात आणि नदीच्या समोरील तीरावरून असणाऱ्या परिसरातून काही मुले त्या बाणांना विरोधी बाण आकाशात आकाशा सोडतात जणू जणू रामायण महाभारतातील युद्धच आपण पाहत आहोत असा भास निर्माण होतो .पण कधीकधी काही व्रात्य मुले गंमत म्हणून हेच बाण आडवे सोडतात आणि हा नजारा पाहण्यासाठी पुढे असणाऱ्या प्रेक्षकांची पळता भुई थोडी होते .
दीपोत्सवाने या सगळ्या परिसराचे सौंदर्य द्विगुणीत होत असते. हा दीपोत्सव म्हणजे वाईच्या उत्सव संस्कृतीतील एक सुंदर स्वप्न आहे. सौंदर्याने नटलेली वाई पहायची असेल तर या वाईच्या आगळ्यावेगळ्या दीपोत्सवाला जरूर हजेरी लावली पाहिजे.