सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील मोठया बाजारपेठेचे गाव असलेल्या कुडाळ येथे एकाच रात्रीत चोरट्यानी चार बंद घरे फोडून सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे , बाळकृष्ण खटावकर, गोविंदाराव शिंदे व चंद्रशेखर गजानन जोशी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यानी घरातील साहित्य व फर्निचर अस्ताव्यस्त केले.यामध्ये चंद्रशेखर जोशी यांच्या घरातून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू मिळून अंदाजे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच बाळकृष्ण खटावकर यांच्या घरातूनही सोने व चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. अन्य दोन ठिकाणी चोरांच्या हाती काही लागले नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सपोनि अमोल माने यांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन तपासाची सूत्रे हलवली. तपासासाठी स्वान पथक व ठसे तज्ञाना पाचरण करण्यात आले होते. दरम्यान स्वयंसेवकांनी गस्ती पथक तयार करून रात्र गस्त सुरु करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सपोनि अमोल माने यांनी केले आहे.
मेढा पोलिसांनी केलेल्या आवाहना नुसार कुडाळ ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात सी सी टीव्ही यंत्रणा चार वर्षांपूर्वी बसवण्यात आली आहे. परंतु काही दिवसांतच ही यंत्रणा बंद पडली आहे. पोलिसांनी ही यंत्रणा तातडीने सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.