सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक : हेमंत गडकरी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी साठी आलेल्या नगर जिल्ह्यातील ऊस तोड कामगाराच्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून बारामती येथील डॉ मुथा यांनी यशस्वी उपचार केल्याने त्या चिमुकल्या चे प्राण वाचले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊस तोड मजूर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आले आहेत. कोऱ्हाळे बुद्रुक गावात एका वस्तीवर ऊस तोड मजूर ऊसाची तोड करत आहेत. या मजुराचा तीन वर्षीय मुलगा युवराज राठोड कोपी समोर खेळत असताना अचानक त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये युवराजच्या जबड्याला जबर चावा कुत्र्यांनी घेतला.
जखमी अवस्थेत त्याला बारामती येथील श्रीपाल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र ऊसतोड मजुराची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने डॉ राजेंद्र मुथा व डॉ सौरभ मुथा यांनी मोफत उपचार केले. शिवाय औषधोपचार ही केले. यामध्ये युवराजच्या जबड्याला सुमारे 55 टाके पडले आहेत.