सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई ! दौलतराव पिसाळ
भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर- खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या ऊसास प्रतिटन २ हजार ५०० रूपये एवढी पहिली उचल देण्यात येणार असल्याची माहिती, वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात आमदर मकरंद पाटील पुढे म्हटले आहे की, मागील व्यवस्थापनाने कारखान्याचे एक वेगळेच चित्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे उभे केलेले होते. परंतु सत्य कधीही लपुन राहत नाही, ते कधी ना कधी समोर येतेच. सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांची थकलेली ऊस बीले, कामगारांचे थकलेले पगार यातून होणारा मानसिक व आर्थिक त्रास ही परिस्थिती खुप भयावह होती. परंतु सुज्ञ सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवित मे २०२२ मध्ये कारखान्याची सुत्र आमच्या व्यवस्थापनाच्या ताब्यात दिली. त्यानंतर आमच्या व्यवस्थापनानेही शेतकऱ्यांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र राहुन किसन वीर व खंडाळा कारखान्याची अंतर्गत कामे पुर्ण करीत निर्धारित वेळेत कारखाने सुरू करून गाळपासही सुरूवात केली. तरीदेखील समाजातील काही अपप्रवृत्ती शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील दैनिकामध्ये किसन वीरची पहिली उचल प्रतिटन २ हजार ३५० रूपये इतकी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या वृत्तामुळे किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. त्यामुळे किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे येणाऱ्या ऊसाला प्रतिटन २ हजार ५०० रूपये एवढी पहिली उचल देण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे गळीताकरिता आलेल्या ऊस बीलाचा पहिल्या पंधरवड्याचे बील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. गळीत हंगामाच्या अखेरीस एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल त्यानुसारच किसन वीर कारखान्याचा अंतिम दर राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
-----------------
किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला परिपक्व झालेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळाने केलेले आहे.
-------------