सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक कै. रामचंद्र भुजंगराव परकाळे यांनी १९८२ साली सोपानकाका पालखी सोहळ्याला मानाचा अश्व दिला. त्यांच्या पश्चात कै. सोपान परकाळे, कै. पुरुषोत्तम परकाळे, अंजनगाव चे माजी सरपंच दिलीप परकाळे, दिगंबर परकाळे व नातू अजित परकाळे यांनी गेली ४० वर्ष ही परंपरा अखंडित ठेवली आहे.
परकाळे कुटुंबीयांनी पूर्वी घेतलेला मानाचा अश्वाचे वय झाल्याने त्यांनी आता नवीन मानाचा अश्व खरेदी केला असून त्याच बरोबर रिंगण सोहळ्यासाठी लागणारा अश्व देखील त्यांनी खरेदी केला आहे. संत सोपानकाका आषाढवारी पालखी सोहळ्याचे अश्वाचे मानकरी दिलीप परकाळे, अजित परकाळे (अंजनगावकर) यांनी देवासाठी नवीन अश्वांची खरेदी केली व देऊळवाडयात हे अश्व सोपानकाका समाधी चरणी नतमस्तक झाले. या प्रसंगी अश्वांचे पूजन ह भ प नानामहराज वासकर, ह भ प बंडातात्या कराडकर तसेच ह भ प केशव महाराज नामदास (संत नामदेव यांचे वंशज) यांचे हस्ते करण्यात आले.
तसेच प पू श्रीगुरु अंमळनेरकर महाराज यांनी ही आशीर्वाद दिले. या प्रसंगी मानकरी अजित परकाळे, बापूसाहेब परकाळे, ह भ प सुहास महाराज निबंधे, ह भ प श्रीनाथ महाराज शिरवळकर, देवस्थान चोपदार श्री. सिद्धेश महाराज शिंदे, तसेच देवस्थान चे विश्वस्त ह भ प त्रिगुण महाराज गोसावी उपस्थित होते.