Baramati big breaking ! सोमेश्वर कारखान्याच्या 'या' संचालकांचे संचालक पद धोक्यात : कारखान्याची निवडणूक लढतेवेळी एका संस्थेचे थकबाकीदार असल्याने पद जाण्याची शक्यता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामठे हे संचालक पदावर निवडून येताना एका सहकारी बँकेचे थकबाकीदार होते. त्यामुळे ते कारखान्याच्या संचालकपदी राहण्यास अपात्र ठरत असून त्यांचे पद रद्द करणे आवश्यक आहे, असे मत प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने नोंदविले आहे.  
           खळद (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब कामथे यांना सोमेश्वर कारखान्याच्या संचालक पदाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली. ऑक्टोबर २०२१ मध्ये ते मोठ्या मताधिक्याने संचालक म्हणून निवडूनही आले. मात्र आता त्यांचे संचालक पद संकटात आले आहे. डेक्कन मर्चंटस को-ऑपरेटीव्ह बँक, मुंबई यांच्या सासवड शाखेकडून कामथे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाची भरपाई मुदतीत न केल्याने डेक्कन बँकेने ताबा नोटीस १३ जून २०२२ रोजी बजावली होती. १५ जुलै रोजी वृत्तपत्रात ताबा नोटिस प्रसिध्दही झाली होती. त्यानुसार मारूती लक्ष्मण कामथे (खळद ता. पुरंदर) यांनी १२ सप्टेंबरला प्रादेशिक सहसंचालकांकडे तक्रार अर्ज करत बाळासाहेब कामथे यांना अपात्र करावे अशी मागणी केली होती.
पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांनी प्रादेशिक सहसंचालकांनी डेक्कन बँकेशी संपर्क साधून कामथे यांच्या कर्जाचा अहवाल मागितला. त्या अहवालामध्ये बँकेने ३० सप्टेंबर २०१८ अखेर व्याजासह २ कोटी ९५ लाख रूपये थकबाकी असल्याचे कळविले. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये संचालकपदी निवडून आलेले कामथे हे थकीत कर्जदार ठरतात, असा निष्कर्ष गोंदे यांनी काढला आहे. त्यामुळे सहकार कायदा १९६१ च्या कलम ५८ मधील वैधानिक तरतुदीनुसार ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालपदी राहण्यास अपात्र ठरत आहेत. तर सहकार कायदा १९६० चे कलम ७३ अ नुसार त्यांचे पद रद्द करणे आवश्यक झाले आहे, असा स्पष्ट निष्कर्ष प्रादेशिक सहसंचालकांनी काढला आहे.
त्यानुसार 'पद रद्द का करण्यात येऊ नये' याबाबत बाळासाहेब कामथे यांना नोटिस बजावण्यात आली आहे. पंधरा दिवसांच्या आत म्हणणे मांडण्याची तसेच ५ जानेवारीला समक्ष म्हणणे सादर करण्याचा आदेश बजावला आहे.
To Top