सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वढाणे येथील पद्मावती रस्ता, बोरकरवाडीकडे जाणारा रस्ता, वढाणे घाट ते खोर शिव रस्ता आणि नळपाणीपुरवठा पाइपलाईन आदी चार विकास कामात माजी सरपंच रामचंद्र चौधरी आणि विद्यमान सदस्य भानुदास चौधरी यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे पत्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना देण्यात आले आहे.
पद्मावती मंदिर ते पद्मावती वस्ती या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ३ लाख ५६ हजार खर्चाचा निधी आला होता. मात्र हा रस्ता ना पद्मावती मंदिरापर्यंत बनवला गेला, ना पद्मावती वस्तीपर्यंत, मध्येच रस्ता बनवला गेला आहे. या रस्त्याची ग्रा. पं. सदस्य भानुदास चौधरी आणि त्यांचा भाऊ हनुमंत चौधरी यांच्या नावाने बोगस बीले काढुन निधी हडपल्याची तक्रार येथील उद्धव सावंत यांनी केली आहे.
तसेच खोर शिव ते वढाणे घाट या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४ लाख ४६ हजार निधी मंजुर होता. मात्र रस्त्याचे काम न करताच बोगस बीले दाखवुन शासनाच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
वढाणे गांवापासून पश्चिमेला ३ कि.मी. अंतरावर २५ ते ३० घरांची पद्मावती वस्ती आहे. हा रस्ता वढाणे बाजुस करण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये झाला होता. मात्र तसे न होता बोरकरवाडी बाजुने ग्रा. पं. सदस्य भानुदास चौधरी याने वैयक्तिक स्वार्थासाठी त्याच्या शेतात जाण्याच्या सोईसाठी रस्ता तयार केला. तसेच या रस्त्यासाठी आपल्या शेतातील मुरुम विकुन पैसे कमविण्यासाठी पदाचा गैरवापर करुन शासनाच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
याठिकाणी जाण्यायेण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांचे फार हाल होत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातुन अखेर १३९० मिटर लांबीच्या पक्या रस्त्याला सुमारे ७५ लाखाच्या खर्चाची मंजुरी मिळाली. मात्र या रस्त्यावर मुरुम, खडी योग्य प्रमाणात टाकण्यात आली नसल्याने कामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. या रस्त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
येथील ग्रामपंचायतीच्यावतीने पाईपलाईन दुरुस्तीसाठी सुमारे ४ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या कामात जुनी विहिर ते नविन विहिर यामध्ये कमी अंतर आहे. या दोन विहिरींच्या मध्ये टाकलेल्या पाईपलाईनचा खर्चही संशयास्पद असल्याचा आरोप उद्धव सावंत यांनी केला आहे.
पद्मावती वस्तीवर अंतर्गत रस्त्याचे काम चालू आहे. पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचेही काम चालू आहे. परंतु पद्मावती वस्तीवर होणारा डांबरी रस्ता कोणत्याही डांबरी रस्त्यापर्यंत नसल्याने लोकांची फार अडचण होणार आहे. हा डांबरी रस्ता वढाणे गावच्या दिशेने न नेता तो शेतात जानेसाठी बनवल्याने शासनाची व स्थानिक लोकांची फसवणूक करून आधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतानेच ही कामे झाली असल्याने या कामाची त्वरित चौकशी व्हावी अशी मागणीचे पत्र विरोधीपक्षनेते अजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान सरपंच यांच्याशी संपर्क होवु शकला नाही. तर येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य भानुदास चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, येथील रस्ते हे सर्व प्रशासकीय मान्यतेनुसार झालेले आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे राजकिय द्वेषापोटी व सुडबुद्धीने करण्यात आले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
.