सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होत असून आज निवडणुकीतील प्रचाराचा शेवटचा दिवस संपला. तालुक्यातील मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळशी अशा एकूण १३ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे.
मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार अवस्थेत पोचली आहे. ओबीसी आरक्षणाअंतर्गत असलेल्या सरपंचपदासाठी नंदकुमार नामदेव शिंगटे विरूध्द गणपत मारूती फरांदे अशी लक्षवेधी लढत होत असून यामध्ये सोमेश्वर कारखान्याच्या आजी-माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मुरूम हे सोमेश्वर काऱखाना, बारामती तालुका दूध संघ, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी सातत्याने राजकीय प्रतिनिधीत्व करणारे गाव आहे. या गावात दोन गटात सरळ लढत पहायला मिळत आहे. सत्ताधारी प्रस्थापित गटाच्या मल्लिकार्जुन स्वाभीमानी गावकरी विकास पॅनेलला नव्या-जुन्या पिढीच्या गटाने मल्लिकार्जुन गावकरी परिवर्तन पॅनेलने आव्हान दिले आहे. निवडणुकीत उच्चशिक्षित तसेच तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात उतरली आहे. तेरा जागांवर स्वाभीमानी व परिवर्तन यांच्या समोरासमोर सामना होत आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत असलेल्या सरपंचपदासाठी उद्योजक नंदकुमार शिंगटे व प्रगतशील शेतकरी गणपत फरांदे यांच्यात सामना होत आहे. आरोप-प्रत्यारोपाने निवडणूक गाजत आहे.
प्रभाग एकमध्ये स्वाभीमानीकडून उभ्या असलेल्या विक्रम अशोक शिंदे, अश्विनी संदीप चव्हाण, शिवानी शेखर सोनवणे यांना परिवर्तनच्या अक्षय संजय जगताप, सविता दिलीप धुमाळ आणि सुरेखा बुध्देश्वर काकडे यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग दोनमध्ये स्वाभीमानीच्या प्रज्ञा राहुल शिंदे व स्वप्नील रावसाहेब कदम या उच्चशिक्षितांना डॉ. अमोल सुरेश जगताप आणि पूजा विशाल फरांदे उच्चशिक्षितांनी कडवे आव्हान दिले आहे. प्रभाग तीनमध्ये स्वाभीमानीचे सोमनाथ प्रताप सोनवणे व वर्षा सोमनाथ जगताप यांना परिवर्तनचे बाळू गणपत सोनवणे व अरूणा माणिक जगताप यांचा सामना होत आहे. प्रभाग चारमध्ये भावकीतली लढत रंगत आहे. स्वाभीमानीच्या कांतिलाल हनुमंत भंडलकर, नीता विनायक भंडलकर व अजित हनुमंत भोसले यांचा सामना अंकुश मल्हारी भंडलकर, प्रकाश संपतराव भंडलकर, रंजना कृष्णा भंडलकर यांच्याशी होत आहे. तर प्रभाग पाचमध्ये बंटीराजे वसंतराव जगताप व प्रशिल प्रकाश जगताप या चुलत्या-पुतण्याची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. याशिवाय मंगल शशिकांत सोनवणे व सदफ रशिदभाई इनामदार हे सुलभा अजित सोनवणे व हसिना सुलतान इनामदार यांच्याशी भिडले आहेत. निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांसह गावकी-भावकी, ओबीसी, अतिक्रमणे असे विविध मुद्दे उकरून काढले जात असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तर वाणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीमध्ये हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या तेरापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरीत जागांवर अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, सरपंचपदाच्या निवडणुकीत विद्या सुनिल भोसले यांना अपक्ष उमेदवार गितांजली दिग्विजय जगताप यांनी आव्हान दिले आहे.
वाणेवाडी गावाला बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. त्या दृष्टीने यावेळीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी प्रयास केले मात्र अखेर तेरापैकी नऊ जागांवर निवडणूक लागली आहे. ग्रामस्थांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून उद्योजक सुनिल भोसले यांच्या पत्नी विद्या भोसले यांना उमेदवारी मिळाली असून त्याविरोधात माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या पत्नी गितांजली जगताप यांनी आव्हान दिले आहे. निवडणूक अंतिम टप्प्याकडे सरकत असून चुरसही वाढली आहे. दरम्यान प्रभाग एकमधून वंदना संतोष चौगुले, प्रभाग दोनमधून सतीश गोरख जगताप व दीपाली मिलिंद सटाले तर प्रभाग तीनमधून वनिता नानासो कोकरे या हनुमान ग्रामविकासच्या चार जागा बिनविरोध आल्या आहेत. आता प्रभाग एकमध्ये अजित भोसले, उजमा शिकीलकर यांचा तृप्ती इंद्रजित भोसले व इंद्रजित भोसले यांच्याशी सामना होत आहे. प्रभाग तीनमध्ये संतोष जगताप विरूध्द रविराज जगताप अशी भावीकीत लढत होत आहे. प्रभाग चारमध्ये सोनाली संतोष निकम, मंगल हरिश्चंद्र मुळीक, माजी उपसरपंच गोपाळ तानाजी चव्हाण यांची धीरज चव्हाण व लता यादव यांच्याशी लढत होत आहे. तर पाचव्या प्रभागात हनुमानच्या अनिता प्रकाश शिंदे, शारदा भीमराव जाधव, शेखर तुळशीराम कोंडे यांची मयुरी पवार, रमेश घाडगे, माया शिंदे या अपक्षांशी लढत होत आहे.