जावली ! बापूराव महादेव पार्टे नागरी सहकारी पतसंस्थेस ठेवीदाराचे पैसे देण्याचे आदेश ! ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय : आयोगाच्या आदेशाने जावलीत खळबळ

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
संस्थेमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जावली तालुक्यातील बापूराव महादेव पार्टे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. केळघर या पतसंस्थे विरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलींद पवार ( हिरुगडे ) यांनी ठेवीदाराने ठेवलेल्या मुदतठेवी व्याजसह परत देण्याचे आदेश दिले आहेत. 
           बापूराव महादेव पार्टे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. केळघर या पतसंस्थेच्या मेढा येथिल शाखेमध्ये सोमनाथ साखरे व अक्षय साखरे यांच्या नावे सन २०१७ मध्ये मुदत ठेव स्वरूपात काही रक्कम ठेवण्यात आल्या होत्या. पावती क्र. १२७७, १२७८ व १२७९ या मुदत ठेव पावत्यांची मुदत सन २०१८ मध्ये संपल्यानंतर ठेवीदाराने ठेव पावत्यांची रक्कम वारंवार तोंडी मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर लेखी मागणी करण्यात येवुन सुद्धा सोमनाथ साखरे यांना मुदतठेव पावत्यांची रक्कम देण्यात आली नाही.
            बापूराव महादेव पार्टे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. केळघर यांचे कडून मुदत ठेव रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी संस्थे विरोधात सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे कडे रितसर दि. ८ मार्च २०१९ रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीचा निकाल दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी लागला असुन संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालकांसह व्यवस्थापक यांना मुदत ठेव साठी जबाबदार धरण्यात येवुन ठेवीदाराचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.
            या आदेशामध्ये तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करणेत येत आहे. सामने वाले क्र. १ ते ११ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार नं. १ सोमनाथ साखरे व  नं. २ अक्षय साखरे यांना निकाल पत्रातील अनुक्रमे कलम १ ( A ) व कलम १ (B ) मध्ये नमुद ठेव मधील रक्कम अदा करावी. तसेच तक्रारदार यांना झालेल्या त्रासापोटी रक्कम रु. ५ हजार व या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. ३ हजार अदा करावेत आदी आदेशात नमुद करण्यात आले असून वरील आदेशाची अंमलबजावणी या आदेशाची प्रत मिळाले पासून ६० दिवसाचे आत करावी असेही म्हटले आहे.
              सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलींद पवार ( हिरुगडे ) , सदस्य राहुल पाटील व दिनेश गवळी यांचे कोर्टात युक्तीवाद होवुन अर्जदार सोमनाथ साखरे व सामनेवाले नं. ६ यांचे तर्फे अॅड  भोसले आणि सामनेवाले १ते ४ व ८ ते ११ यांचे तर्फे अॅड महाडिक यांनी कैफीयत मांडली तर सामनेवाले ५ व ७ यांचे विरोधात एकतर्फा निकाल देण्यात आला.
             बापूराव महादेव पार्टे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. केळघर या संस्थेच्या विरोधात ठेवीदाराचे पैसे देण्याचा आदेश झाल्याचे समजल्याने ठेवीदारांच्या मध्ये खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे.
To Top