सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
मांढरदेवी ता.वाई श्री काळुबाई देवीच्या येऊ घातलेल्या ५ जानेवारी ते ७ जानेवारी यात्रा काळात भोर प्रशासकीय यंत्रणांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारत सतर्क रहावे अशा सूचना काळुबाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रशासकीय बैठकीत भोर येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिल्या.
मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेसाठी राज्यातून भाविक भक्त लाखोंच्या घरात येत असतात.मात्र मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा जेमतेम भरली गेली होती .यंदा मोठ्या प्रमाणावर यात्रा भरण्याची शक्यता असून गर्दी होणार असल्याचे चित्र असल्याने यात्रा काळात भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये तसेच यात्रा सुरळीतपणे पार पडावी यासाठी भोर येथे महसूल,आरोग्य,पशुसंवर्धन,एसटी आगार प्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, तलाठी, ग्रामसेवक या प्रशासकिय अधिकाऱ्यांची यात्रा पूर्व तयारी आढावा बैठक बोलवण्यात आली होती.या बैठकीत सर्वच प्रशासनाला यात्रा संबंधी सूचना दिल्या गेल्या.यावेळी भोर तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे सर्कल पांडुरंग लहारे, तलाठी किरण साळुंखे ,ग्रामसेवक गुत्ते आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.