सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील आज १३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे आज लग्नसराईचा मुहूर्त देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ज्या गावात निवडणूक मतदान आहे. अशा गावातील वऱ्हाडी धावपळ उडाली. वाघळवाडी गावातील आज ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र गावात निवडणूकीची चाललेली धावपळीत आपल्या लग्नाला गावातीलच लोक नाही आले तर काय उपयोग म्हणून रामचंद्र शिंदे यांनी गावातील सर्व नागरिकांना लग्नाला येता यावे म्हणून चक्क लग्नाचा मुहूर्तच बदलला.
बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावातील रामचंद्र शिंदे यांच्या बी ई मॅकेनिकल असलेला मुलगा अमित याचा व खंडाळा तालुक्यातील मरीचीआईवाडीची येथील देविदास यादव यांनी फार्मसी झालेली कन्या स्वाती यांचा शुभविवाह आज दि १८ रोजी दुपारी दोन वाजता निंबुत येथील समता पॅलेस कार्यालयात पार पडणार होता. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ग्रामस्थांची चाललेली पळापळ पाहून आपल्या लग्नाला ग्रामस्थ येतील याची काही शाश्वती नव्हती. आणि जर ग्रामस्थ, जिवाभावाचे मित्रच लग्नाला आले नाहीत तर त्या लग्नाला काय मज्जा असे म्हणत नवरदेव अमित शिंदे याने दुपारचं लग्न सायंकाळी घेण्याचा निर्णय घेतला. शिंदे आणि यादव कुटुंबियांनी तातडीने भटजींकडून दुसरी वेळ ठरवीत लग्नाचा मुहूर्त लांबविला. दरम्यान रामचंद्र शिंदे व सर्व कुटुंबियांनी मतदान केंद्रावर येत लग्नापेक्षा लोकशाहीला जास्त महत्व देत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया थांबल्यानंतर वाघळवाडी गावाने सायंकाळी ६ वाजता वधू वरांना शुभाशीर्वाद देत मोठ्या धुमधडाक्यात विवाह लावून दिला.