मेढा : प्रतिनिधी
मेढा - जावली तालुक्यातील कुसुंबी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सहा सदस्य पदासाठी निवडणूक होत असताना दुंद गावचे साधारण शंभरहुन अधिक मतदार कुसुंबी गावचे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची जोरदार चर्चा होत असताना दुंद गावचे मतदार कुसुंबी गावासाठी निर्णायक ठरणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे तर खुद्द दुंद गावचे सरपंच व दोन सदस्यच मतदार यादीत गेल्याने सध्या ते कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
कुसुंबी ग्रामपंचायतीच्या निवडणूकी मध्ये ५५८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये दुंद गावचे साधारण १०० पेक्षा अधिक मतदारांची नावे यादीत समाविष्ट केलेची चर्चा आहे. कुसुंबी ग्रामपंचायतीकडून मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर कोणीही अक्षेप नोंदविला नसल्याने शासनाने यादी मंजुर करून ती प्रसिद्ध केली. दरम्यान सदरची यादी कुसुंबी गावातील ग्रामपंतीमध्ये प्रसिद्ध झाल्याने दुंद मतदारांना त्यांच्या नावाची कल्पना आली नाही आणि संबधीत अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा केली नाही.
कुसुंबी ग्रामस्थ, संबंधीत अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे सध्या दुंद गावचे सरपंच व दोन सदस्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच दुंद गावचे मतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्यास मतदानाचा निकाल अनपेक्षीत लागण्याची शक्यता आहे. सरपंच व सदस्य पदावर नियुक्ती मिळाणारी व्यक्ती ही त्याच गावची मतदार असावी लागते तसा मतदार यादीच्या अनुक्रमांकाची नोंद शासनास द्यावी लागते.
सध्या दुंद गावचे सरपंच व सदस्य मतदार कुसुंबी गावचे झाल्याने दुंद गावच्या सरपंच व सदस्य पदांवर बडतर्फीची कुऱ्हाड येणार कि शासन त्यांना अभय देणार ? दुंद गावचे मतदारांमुळे कुसुंबी गावची निवडणूक पारदर्शक होणार का? मतदार यादी प्रसिध्द करणारांची चुक का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी शोधतील काय ? अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान दुंद गावचे माजी सरपंच सोपान दुंदळे यांनी सरपंच व सदस्य सह शंभर हुन अधिक आमचे गावचे मतदार कुसुंबी गावचे मतदार यादीत समाविष्ट असल्याचे सांगितले आहे.