सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील पाडेगाव विविध कार्यकारी सोसायटीत चालत असलेल्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिल्याने पाडेगाव सोसायटीतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सातारा येथील विश्रामगृह येथे दि. ५ रोजी सहकार मंत्री अतुल सावे व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन या विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंकर दडस यांनी पाडेगाव विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड, पाडेगाव या संस्थेत होत असलेल्या गैरकारभार, भ्रष्टाचाराबाबत निवेदन देवून संस्थेचे मागील १५ वर्षापासूनचे टेस्ट ऑडीट करून कलम ८३ अंतर्गत चौकशी करून चौकशीत दोषी आढळल्यास संस्थाचालक, सचिवांवर कलम ८८ प्रमाणे कारवाई करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मंत्री अतुल सावे यांनी सातारा येथील उपनिबंधक माळी यांना तात्काळ कारवाईचे आदेश देत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिला.
यावेळी भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंकर दडस यांच्यासह किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ , जिल्हा सचिव देविदास चव्हाण तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.