सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ग्रामपंचायत वाघळवाडी- सोमेश्वरनगर येथील सरकारी जमीन गटामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश यादव यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पूर्ण जिल्हा परिषदेने घेत बारामतीचे उपविभागीय अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना याबाबत चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ देण्यात यावा याबाबत आदेश दिले आहेत.
सुरेश यादव यांनी वाघळवाडी येथील गट क्रमांक ४९ मध्ये ४ हेक्टर ६७ आर क्षेत्रात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी संगनमताने सिमेंट खांब उभारून सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे केली होती. यादव यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अजित कुऱ्हाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत) सचिन घाडगे यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी व पंचायत समितीला पत्र देत संबंधित अतिक्रमणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सुरेश यादव यांनी सरकारी जमीन गटात अतिक्रमण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याने शासन निर्णयानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.