सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत थेट जनतेमधून निवड झालेल्या सरपंच पदाच्या निवडी नंतर आता उद्या -परवा उपसरपंच पदाची निवडणूका होणार आहेत. बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याने 'ऑन द वे' गुवाहाटी असे स्टेटस ठेवले आहे. त्याचीच चर्चा बारामती तालुक्यात सगळीकडे होत आहे. तर समोरील सदस्य फोडण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून जोरदार फिल्डींग लागली गेली असून १० लाख का जाईनात पण उपसरपंच आपलाच झाला पाहिजे अशी मानसिकता सद्या तरी दिसत आहे.
सरपंचाना दिलेल्या दोन मताच्या अधिकारामुळे सरपंच नाहीतर उपसरपंच तरी पदरात पार पाडण्यासाठी पॅनेल प्रमुखांनी आपले सदस्य जागेवर ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एक सदस्य जरी फुटला तरी सम-समान बहुमत झाल्यावर सरपंचाला दोन मतांचा अधिकार असल्याने दुसरे निर्णणायक मत सरपंचानी दिल्यास उपसरपंच पद सरपंच ज्या गटाचा तिकडे जाणार आहे. निवडून आलेल्यातील एखादा सदस्य जर फुटला तर हातातलं उपसरपंचपद पण जायचं या धास्तीने आपले सदस्य गुहाटीला पाठवण्याची वेळ पॅनेल प्रमुखावर आली आहे. बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याने 'ऑन द वे गुवाहाटी' असे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्याची चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात सत्ता बदल झाली त्यावेळी आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे गुहाटी हे ठिकाण चर्चेत आले होते. सदस्य फुटू नयेत म्हणून ग्रामपंचायत सदस्यांना पण गाव सोडून बाहेर जावे लागले आहे. त्यांनी 'ऑन द वे गुवाहाटी' पोस्ट करून आता आम्ही उपसरपंच निवडीलाच येणार असल्याचे समाजमाध्यमावर पोस्ट करून सांगितले आहे. ते गुवाहाटी ला तर नक्कीच जाऊ शकणार नाहीत पण कोणत्या स्थळी गेलेत हे आल्यावरच समजू शकणार आहे.