सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जुनाट पूल पाडून नवा बांधण्यामागे लोकांची सोय करणे हा हेतू असतो. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नीरा डावा कालव्यावर शेंडकरवाडी (ता. बारामती) येथे नव्याने बांधत असलेला पूल मात्र अनावश्यक उंचीचा झाला असल्याने शेतकऱी, प्रवासी यांच्यासाठी गैरसोयीचाच ठरणार आहे. पूल उंच होत असल्यामुळे आता नाईलाजास्तव दोन्ही बाजूला उतार काढावा लागेल असा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाला आहे. त्यामुळे सदर पूल असून अडचण नसून खोळंबा असा ठरणार आहे.
करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत शेंडकरवाडी येथे १९२० साली इंग्रजांनी नीरा डावा कालव्यावर दगडी पूल बांधला होता आणि शंभर वर्ष या पुलाने कुठलाही दगाफटका केला नाही. अगदी भरावालगत असलेल्या या पुलावरून ऊस वाहतूकही होत होती. शेंडकरवाडी, करंजे, चौधरवाडी, मगरवाडी अशा सर्व गावांना या पुलावरून कालवा ओलांडून शेतात जावे लागते. तसेच नीरा-बारामती रस्त्यावरील कोऱ्हाळे, वडगाव, होळ, सोरटेवाडी ग्रामस्थांना शेंडकरवाडीवरील सदर पुलावरून सोमेश्वर मंदिराला जाणे अधिक सोयीस्कर ठरते. त्यामुळे जुनाट पूल पाडून नवा बांधण्याचे काम सुरू झाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पावणेदोन कोटी रूपये निधी मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बहुधा कार्यालयात बसूनच डिझाईन ठोकून दिले असावे तर पाटबंधारे खात्याच्या तज्ञांनीही पूल बांधताना पुरेसे गांभीर्याने घेतले नसावे. त्यामुळे पूल भरावापासून तब्बल दोन मीटर उंचीचा झाला आहे. सव्वाशे किलोमीटर अंतर असलेल्या डावा कालव्यावर कुठेही इतक्या उंचीचा पूल नाही. ही ऐतिहासिक कामगिरी बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असल्याची टीका आता होता आहे. या पुलाचे सध्या काम सुरू आहे. मात्र तो नेमका कसा होणार, किती उंचीचा होणार याची ग्रामस्थांना कल्पना नव्हती. ते अधिकाऱ्यांवर विश्वास टाकून मोकळे झाले होते. मात्र आता अधिकारी हुशार असतात हा ग्रामस्थांचा भ्रम लवकरच तुटला. जे अडाणी माणूस सांगू शकतो ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही. अखेर याची तक्रार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. आता पवार यांनी पूल उंच झाल्याने दोन्ही बाजूला उतार काढा असा आदेश दिला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्याच एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिली. पाटबंधारे खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एमकमेकांवर टोलवाटोलवी करत आहेत.
मात्र सदर पुलाच्या दोन्ही बाजूंनी उतार काढायला कितपत संधी आहे याबाबत ग्रामस्थ शंका व्यक्त करत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात नाराजीची भावना पसरली असून उसाच्या गाड्या अथवा पिके यांची वाहतूक पुलावरून कशी करायची असा प्रश्न पडला आहे. सध्या दोन महिने झाले शेताकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने शेतकरी अत्यंत दुरून पर्यायी मागर्चा वापर करून त्रास सहन करत आहेत. त्यांना चांगला पूल मिळेल अशा अपेक्षेने सहनशीलता दाखवत आहेत. मात्र आता आधीचा जुनाट पूलच बरा असे म्हणू लागले आहेत.
याबाबत सोमेश्वर कारखान्याचे माजी संचलाक रूपचंद शेंडकर यांनी, अजितदादांमुळे पुलाला पावणेदोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. परंतू अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पूल उंच झाला आहे. आता अधिकारी मंडळींनी ताबडतोब ग्रामस्थांचे शंकानिरसन केले नाही तर सगळेच आदरणीय अजितदादांना भेटून सदर हलगर्जीपणा कानावर घालणार आहोत. पीडब्लूडीचे शाखा अभियंता आर. एम. मुखेकर म्हणाले, दोन्ही बाजूंनी स्लोप देऊन उंची मेंटेन करणार आहोत. गावाच्या बाजूलाही स्लोप बसतो आहे. आम्ही सुरवातीला नीट करत होतो पण पाटबंधारे खात्यानेच तशी मंजुरी दिली नाही. कालवा नूतनीकरण होणार म्हणून आम्हाला तसं करायला सांगितलं अन्यथा एक मीटरने उंची कमी करता आली असती.