सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कलकत्ता, मुंबई ही उद्योधंद्याची ठिकाणे होती. ग्रामीण भागातही साखर कारखाने एकेकाळी खासगी मालकीचे होते. मात्र शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना ही संकल्पना नव्हती. माळीनगरला पहिला कारखाना शेतकऱ्यांनी मिळून काढला. पुढे कारखानदारी वाढली. सहकारी साखर कारखानदारीतून शिक्षणाचा विस्तार ही संकल्पना रूजली आणि त्यामुळे शिक्षणाची दालनं खुली झाली. नोकऱ्यांची निर्मिती केली, अशी सहकारी साखर कारखानदारीची पाठराखण शरद पवार यांनी केली तसेच, 'महिलांची पन्नास टक्के शक्ती समाजाच्या, देशाच्या उपयोगी आणली नाही तर देश मागास राहिल, असे भविष्यही त्यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयांची पाहणी पवार यांनी केली. संचालक मंडळाशी बैठक घेतली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी मुक्त संवाद साधला. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सुनिल भगत, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, बाळासाहेब कामथे, किसन तांबे, राजेंद्र यादव, भारत खोमणे, डॉ. संजय देवकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पवार म्हणाले, सोमेश्वर परिसरात माळेगाव व सणसर कारखान्याच्या कार्यक्षेत्रापेक्षा चांगला ऊस असायचा. गुळाची बाजारपेठ नीरा गावात होती. पूर्वीच्या जाणकार लोकांनी कारखानदारीत लक्ष घातलं. त्यामुळे आज उत्तम शिक्षणसंस्था उभ्य राहिल्या आहेत, असे कौतुक शरद पवार यांनी केले. राज्याचा मी मुख्यमंत्री असताना काही भूमिका घेतल्या. सरकार चालवण्यासाठी नोकरभरती करताना त्यामध्ये तीस टक्के मुलींना संधी द्यायचा निर्णय घेतला. जमीनीचा सातबारा आणि घराची प्रॉपर्टी यामध्ये महिलेचे नाव टाकण्याचा कायदा मी करायला सांगितला. कायदा विधानसभेत मंजूर करताना अनेकजण मान्य करत नव्हते. रात्री अकरापर्यंत चर्चाच सुरू होती. मी विधानसभेत पुन्हा आल्यावर सगळ्यांना विश्वासात घेऊन विषय पटवून दिला. लोकशाहीत विश्वासात घेऊन चर्चा करावी लागते, असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
अमेरिकेत गेल्यावर भारताच्या संरक्षणमंत्र्याला सॅल्यूट करण्यासाठी लेफ्टनंट येतात. मी संरक्षणमंत्री असताना सॅल्यूटला लेफ्टनंट महिला आल्या होत्या. भारतात आल्यावर संरक्षण दलाच्या प्रमुखांना बैठकीत बोलवून मी महिलांना संरक्षण दलात घेण्याचा विषय काढला. तिघांनीही त्याबाबत प्रतिकूल मत मांडले. , मी लोकप्रतिनिधी आहे आणि मी महिलांना सैन्यात घ्यायचं ठरवलं आहे, असा निर्णय घेतल्याचे मी त्यांना सांगितले. आज सियाचिनसारख्या कमी ऑक्सिजन व बर्फाळ प्रदेशात मुली देशसेवा करत आहेत. मैलावर पाकीस्तानचं सैन्य आहे. अलिकडे मुली सीमेचं रक्षण करत आहेत. जसे जवान देशाचं रक्षण करतात तशाच मुलीही करू शकतात. सव्वीस जानेवारी एकदा मी एक महिला परेडचं नेतृत्व करत असल्याचं पाहिलं. असे पवार यांनी सांगितले..