ऊस जळाला आहे....? अशी मिळावा भरपाई...! बारामती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी महावितरणकडून अनुक्रमे मिळवली ९३ हजार व २ लाख ११ हजाराची भरपाई

Admin
3 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी 
वीजकंपनीच्या घोटाळ्यांमुळे ऊस जळीत झालाय, पण भरपाई मिळत नाही, अशीच तक्रार सातत्याने सर्वत्र ऐकू येते. परंतु, थोडा पाठपुरावा करून योग्य कागदपत्रे सादर केली, तर वीजकंपनीला भरपाई द्यावी लागते. होय! वाणेवाडी (ता. बारामती) येथील सुभद्राबाई निंबाळकर यांनी पाठपुरावा करून वीजकंपनीकडून तब्बल ९३ हजार रुपये भरपाई वसूल केली आहे. तर सस्तेवाडी ता. बारामती येथील आनंदराव टकले यांनी तब्बल २ लाख ११ हजार रुपये नुकसान भरपाई मिळवली आहे. 
            शेतातून गेलेल्या विजेच्या तारा लोंबकाळणे, खांबावरील कप फुटणे, ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या उडणे आदी कारणांनी जर ऊस जळाला, तर वीजकंपनीकडून भरपाई मिळू शकते, हे अनेकांना माहीत नाही. अनेकांना कागदपत्रे काय द्यायची, हे समजत नाही. बारामती विभागांतर्गत असलेल्या सोमेश्वर उपविभागात मात्र सुभद्राबाई महादेव निंबाळकर या शेतकरी महिलेने सन २०१७ मध्ये - झालेल्या ऊस जळीताबद्दल तर  वीजकंपनीकडून समाधानकारक नुकसान भरपाई मिळविली आहे. सस्तेवाडी (ता. बारामती) येथील आनंदराव जगन्नाथ टकले यांनी पाठपुरावा करून वीजकंपनीकडून तब्बल २ लाख ११ हजार ७९७ रुपये भरपाई वसूल केली आहे. यासाठी सोमेश्वरचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.
-------------------
अशी मिळावा भरपाई- सादर करावयाची कागदपत्रे.
नुकसान भरपाईचा अर्ज, तलाठी पंचनामा, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पत्र (ऊस जळून व ठिबक जळून किती नुकसान झाले असा उल्लेख असणारे), कारखान्याचे पत्र (गट क्रमांक, क्षेत्र, गाळपाचे टनेज, उसाचा दर, जळीतामुळे केलेली कपात, अदा रक्कम अशा माहितीसह), जळीत वर्ष व मागील तीन वर्षांची कारखान्याची ऊसबिले, ठिबक संच खरेदी बिल, जळीत वर्ष व मागील तीन वर्षांचे सातबारा उतारे व पीकपाहणी, 'शासकीय ,निमशासकीय ,खासगी व अन्य संस्थेकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, भविष्यात घेणार नाही. मी किंवा वारसाने त्यासाठी अर्ज केला नाही करणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र, जळीत क्षेत्रासह शेतकऱ्याचे छायाचित्र आदी कागदपत्रे दाखल करावी लागणार आहेत.
To Top