सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपसरपंच निवडणुकीत अवघ्या चार सदस्य संख्या असलेल्या गटाला उपसरपंचपदाची संधी मिळाली. दिग्विजय जगताप गट विरोधी गटाची दोन मते फोडण्यात यशस्वी झाल्याने उपसरपंचपदाची माळ धीरज चव्हाण यांच्या गळ्यात पडली.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दिग्विजय जगताप यांच्या गटाचे सरपंच गितांजली जगताप व ४ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे ९ सदस्यसंख्या असलेल्या गाव पॅनेलला उपसरपंचपदाची संधी मिळणार हे निश्चितच झाले होते. गाव पॅनेलच्या बाजूने निवडून येवूनही २ सदस्यांनी आपले मत सरपंच गटाला देत उपसरपंचपदी माळ धीरज संपत चव्हाण यांच्या गळ्यात टाकली. ९ पैकी दोन सदस्य फुटले असल्याची जोरदार चर्चा यामुळे परीसरात झाली. ९ सदस्य निवडून येवूनही उपसरपंच पद मिळाले नसल्याने गाव पॅनेलला जोरदार धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून गीतांजली दिग्विजय जगताप या सरपंच म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांच्या गटाचे फक्त ४ सदस्य आणि सरपंच असे ५ संख्याबळ होते. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान पार पडले. गाव पॅनेलकडून अजित रामचंद्र भोसले आणि दिग्विजय जगताप यांच्या गटाकडून धीरज संपत चव्हाण यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले.मतदान प्रक्रीया पार पडल्यानंतर मतमोजणीत दोघांनाही समान ७ मते पडली. यानंतर सरपंच गीतांजली जगताप यांनी आपले निर्णायक मत धीरज चव्हाण दिले. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडत आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे गटशिक्षणाधीकारी एस. ए. गावडे, विस्तार अधिकारी डी. डी. खंडागळे यांनी काम पाहिले तर विस्तार अधिकारी पी. के. गाढवे यांनी त्यांना साहाय्य केले.