हरिश्चंद्रगड ! प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्यास महाराष्ट्र गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वाधिक साहसी मानवंदना : १८०० फुटी कोकणकडा सर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात प्रस्तरारोहणासाठी सर्वाधिक कठीण कडा म्हणून ओळख असणारा हरिश्चंद्रगडावरील १८०० फुटी कोकणकडा टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी "अल्पाइन स्टाईल" ने सर करून तिरंगा फडकावून "भारत माता की जय", "वंदे मातरम" या घोषणा देत प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्यास साहसी मानवंदना दिली. महाराष्ट्र गिर्यारोहण क्षेत्रातील यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्यास दिलेली ही सर्वाधिक साहसी मानवंदना ठरली.
       या मोहिमेची सुरुवात २२ जानेवारी रोजी बेलपाडा गाव, ता.मुरबाड, जि.ठाणे येथून झाली. तब्बल ५ तासांची पायपीट करून कोकणकड्याच्या पायथ्याशी पोहोचता आले. २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रस्तरारोहणास सुरवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत ॲडवान्स बेस कॅम्प या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचून सुमारे ८०० फुटी प्रस्तरारोहण मार्ग पुर्ण केला. दुसऱ्या दिवशी सुमारे ५०० फुटी मार्ग प्रस्तरारोहण करून तेथे मुक्काम केला तर उरलेला ५०० फुटी मार्गात असणारा ओव्हर हँगचा टप्पा तिसऱ्या दिवशी पार करून कडा सर केला.
         शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा १८०० फुटी कठीण प्रस्तरारोहण मार्ग, छातीत धडकी भरावी असे कड्याचे रांगडे रूप, कोणत्याही क्षणी कोसळणारे दगड, घोंगावणाऱ्या मधमाश्या, अतिदुर्गम परिसर असल्याने पाण्याची प्रचंड कमतरता अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन अनिल शिंदे, जॅकी बाळासाहेब साळुंके, विशाल दिलीप बोडके यांनी मोहीम सुरक्षितपणे फत्ते करीत तिरंग्यास साहसी मानवंदना दिली. सहायक संघात भारत वडमारे, तेजस जाधव, राजश्री चौधरी, महेश जाधव, समीर देवरे, उमेश कातकडे आणि डॉ.समीर भिसे यांनी काम पाहिले. मोहिमेचे चित्रीकरण रोहित पाटील, किरण मोहन आणि शुभम सानप यांनी केले.
To Top