सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळुबाई देवी (मांढरदेवी) ता.वाई जि.सातारा च्या यात्रेचा प्रारंभ गुरुवार दि.५ झाला असून यात्रेसाठी पहिल्याच दिवशी भाविक - भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.भोर प्रशासन यात्रेसाठी सज्ज झाले असून पशुहत्या ,वाद्य वाजविणे, देव्हारे नाचवणे ,दारूबंदी हे निर्बंध मात्र यात्रा काळात कायम ठेवण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.
श्री काळुबाई देवीची यात्रा ५ जानेवारी ते ७ जानेवारी पर्यंत होणार असून यात्रा सुरळीत पार पाडावी म्हणून या कालावधीत प्रतिबंधात्मक बंदी आदेश पारित करण्यात आले आहेत .उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांच्या आदेशान्वये फौजदारी दंड प्रक्रिया १४४ मधील अधिकारांवये मांढरदेवी यात्रेच्या भोर तालुक्यातील मौजे नेरे ,बालवडी , आंबाडे ,पळसोशी, वरवडी ,पाले या ठिकाणी यात्रेच्या कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई घालण्यात आलेली आहे.दरम्यान यात्रेसाठी आरोग्य सोयी सुविधा ,वाहतूक नियोजन तसेच वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत केला असून अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत.