सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोविडच्या काळात रामराजे सोसायटीने केलेले काम कौतुकास्पद असून समाजातील प्रत्येक घटकाने सहकार सामाजिक क्षेत्रासाठी आपले कर्तव्य ओळखून काम करावे असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
वाणेवाडी(ता. बारामती) येथील रामराजे सहकारी सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या रामराजे जगताप यांच्या ५२ व्या स्मृतिदिन सोहळ्यात होळकर बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामराजे नानासो जगताप स्मृती गौरव पुरस्कार मुर्टी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सावंत यांना देण्यात आला.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप, सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, उपाध्यक्ष अशोक जाधव, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल भोसले, लालासाहेब नलवडे, किरण आळंदीकर, सचिन खलाटे, सचिव किरण जगताप, संचालकमंडळ उपस्थित होते. होळकर पुढे म्हणाले की, कोरोना काळात रामराजे सोसायटीने आदर्शवत काम करत सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम राखली आहे.सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, दरवर्षी समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सोमेश्वर कारखाना सभासदांनी आर्थिक वाहिनी असून या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. संजय सावंत यावेळी म्हणाले की, सध्या सर्वच क्षेत्रात निराशाजनक वातावरण आहे मात्र सामाजिक क्षेत्रात चांगल्या व्यक्ती असल्याने चांगले काम होत आहे. वैद्यकीय व्यवसाय व सामाजिक बांधिलकी एकाच नाण्याच्या दोन बाजू असून रामराजे सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी कोरोना काळात कोव्हिड सेंटरला मदत करणाऱ्या सामाजिक संघटना व व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुवर्णा निंबाळकर, पॅरास्विमिंग पट्टू अजय भोसले, कुस्तीपटू सायली जगताप आणि शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. परिचय संतोष शेंडकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले. आभार अध्यक्ष चंद्रशेखर जगताप यांनी मानले.