सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असला की , शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांमुळे शेकडो एकर ऊस जळीत झाल्याच्या घटना घडतात. या अगोदर एक रुपया नुकसान भरपाई न देणाऱ्या महावितरण विभागाला शेतकऱ्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल २ लाख ११ हजार नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. वीजकंपनीच्या घोटाळ्यांमुळे ऊस जळीत झालाय, पण भरपाई मिळत नाही, अशीच तक्रार सातत्याने सर्वत्र ऐकू येते. परंतु थोडा पाठपुरावा करून योग्य कागदपत्रे सादर केली, तर वीजकंपनीला भरपाई द्यावी लागते. सस्तेवाडी (ता. बारामती) येथील आनंदराव जगन्नाथ टकले यांनी पाठपुरावा करून वीजकंपनीकडून तब्बल २ लाख ११ हजार ७९७ रुपये भरपाई वसूल केली आहे. यासाठी सोमेश्वरचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.
शेतातून गेलेल्या विजेच्या तारा लोंबकाळणे, खांबावरील कप फुटणे, ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या उडणे आदी कारणांनी जर ऊस जळतो. वीजकंपनीकडून या अगोदर अशा प्रकारची भरपाई मिळत नव्हती. याबाबत शेतकऱ्यांना कागदपत्रे काय द्यायची, हे समजत नव्हते. बारामती विभागांतर्गत असलेल्या सोमेश्वर उपविभागात मात्र शेतकरी आनंदराव लकडे यांनी सन २०२१ मध्ये जळालेल्या ऊसाची भरपाई मिळवली आहे. कागदपत्रे पूर्ण करून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला संचालक ऋषीकेश गायकवाड , बारामती विभागाचे अधिकारी प्रभाकर पवार सोमेश्वर उपविभागाचे सचिन म्हेत्रे यांनी त्याला साथ देत ही भरपाई मिळवून दिली. महावितरणकडून जिल्ह्यात प्रथमच एवढी नुकसान भरपाई मिळाली असल्याचा दावा करण्यात येत आहे.महावितरणच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपये नुकसान होऊनही शेतकऱ्यांना एक रुपयाही नुकसान भरपाई मिळत नव्हती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
.................
गाळप हंगामात दररोज जळीताच्या घटना घडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. या अगोदर वाणेवाडी येथील सुभद्रा निंबाळकर यांना जळीत ऊसाची नुकसान भरपाई मिळाली होती. जळालेल्या ऊसाची कागदपत्रे शेतकऱ्यांनी तातडीने जमा करावीत, कारखान्याच्या वतीने स्वतः आम्ही भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करू.
ऋषिकेश गायकवाड - संचालक सोमेश्वर कारखाना.
...........................
सादर करावयाची कागदपत्रे.
नुकसान भरपाईचा अर्ज, तलाठी पंचनामा, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पत्र (ऊस जळून व ठिबक जळून किती नुकसान झाले असा उल्लेख असणारे), कारखान्याचे पत्र (गट क्रमांक, क्षेत्र, गाळपाचे टनेज, उसाचा दर, जळीतामुळे केलेली कपात, अदा रक्कम अशा माहितीसह), जळीत वर्ष व मागील तीन वर्षांची कारखान्याची ऊसबिले, ठिबक संच खरेदी बिल, जळीत वर्ष व मागील तीन वर्षांचे सातबारा उतारे व पीकपाहणी, 'शासकीय ,निमशासकीय ,खासगी व अन्य संस्थेकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, भविष्यात घेणार नाही. मी किंवा वारसाने त्यासाठी अर्ज केला नाही करणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र, जळीत क्षेत्रासह शेतकऱ्याचे छायाचित्र आदी कागदपत्रे दाखल करावी लागणार आहेत.