सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा-मोरगाव या राज्य महामार्गावरील मधल्या टप्प्यातील काम गेली दोन वर्ष कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले असून प्रवाशी अक्षरशः घायकुतीला आले आहेत. विशेष म्हणजे चक्क प्रशासनही आता हतबल झाले आहे. सदर काम अर्धवट असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पिकांची धुळीने अक्षरशः वाट लागली असून नागरिकांना व जनावरांनाही धुळीचा त्रास होत आहे. लिंबासारख्या झाडेसुध्दा वठून चालली आहेत. काम त्वरीत सुरू करून पूर्ण करावे अथवा कंत्राटदारास काळ्या यादीत टाका, अशी संतप्त मागणी ग्रामस्थ करत आहेत.
मोरगाव-नीरा या २४ किलोमीटर रस्त्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रयत्नातून ४५ कोटी निधी मंजूर झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंचे आठ-आठ किलोमीटरच्या टप्प्यांमधील काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र मधला आठ किलोमीटरचा टप्पा मात्र दीड-दोन वर्ष प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पहात आहे. सदर आठ किलोमीटरचे अक्षरशः मातेरे झाले असून दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत आणि गाड्या मोडीत निघत आहेत. परंतु कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र पाझर फुटला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरील अर्धवट काम झालेल्या पुलात कोसळून सुनिल भोर या तरूणाचा अपघाती मृत्यूही झाला आहे. यानंतर दबाव आल्याने रस्त्याचे काम सुरूही झाले मात्र पुन्हा ते ठप्प झाले. गेली वर्षभर रस्त्यावरील पूलही अर्धवट झाले असून पर्यायी बाह्यवळणावरून वाहतूक होत आहे. अर्धवट पुलांवर अजूनही सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा नाही. याबाबत रविवारी मुर्टी-मोढवे दौऱ्यावर असताना नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही याबाबत तक्रार केली. मात्र अजूनही अधिकारी वर्ग कारवाई करण्याऐवजी हतबलता व्यक्त करत आहे.
दरम्यान, सदर रस्त्यावर मातीयुक्त मुरूम टाकल्याने सर्वत्र फुफाटा उडत असून दोन्ही बाजूंची पिके धोक्यात आहेत. सदर मार्ग नगर-सातारा असल्याने जड वाहनांची चोविस तास वाहतूक आहे. त्यामुळे उसासारखे पिक कसेबसे निभावून नेत अर्धवट वाढत आहे. मात्र मका, हरभरा, ज्वारी अशा पिकांवर चोविस तास धुरळा पडून वाढ खुंटली आहे. रस्त्याकडेचे ढाबेही धुरळा उडत असल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे, एका ढाबाचालकाने सांगितले.
भापकरमळा येथील प्रदीप भापकर म्हणाले, धुरळ्याची मका खाऊन शेतकऱ्यांच्या गाई आजारी पडत असून दूध उत्पादन निम्म्यावर आले आहे. ऊस उत्पादन निम्म्यावर आले तर छोटी पिके उजाड व्हायला लागली आहेत. माजी उपसरपंच तानाजी भापकर म्हणाले, रस्त्याला निकृष्ट माल वापरला तरी कारवाई नाही. रस्त्याचे काम ठप्प झाले तरी कारवाई नाही. कंत्राटदार रस्त्यावर पाणीसुध्दा मारत नाही. नेमके अधिकारी कंत्राटदारावर इतके मेहेरबान का आहेत? तर चौधरवाडीच्या सरपंच अंजना चौधरी म्हणाल्या, दोन-तीन दिवसात काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करणार आहोत.