सुपे परगणा ! मल्हारगड येथुन आणलेल्या शिवज्योतीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
सुपे ( ता. बारामती) येथे शिवप्रेमींच्यावतीने किल्ले मल्हारगड येथुन  आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. यावेळी श्रीं च्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. दरम्यान सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती पालखीत ठेवुन भव्य मिरवणुक काढुन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
    येथील आझाद मैदानावर रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शिवजयंती उत्सव समिती सुपे परगना यांच्यावतीने तसेच  मान्यवरांच्या हस्ते ' श्री ' ना पुष्पहार घालण्यात आला. यावेळी येथील आवारात भव्य मंडप टाकुन पुतळ्यासभोवती आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मुख्य रस्त्यांवर दर्शनी भागात स्वागत कमाण टाकुन परिसर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला होता. 
    त्यानंतर सायंकाळी भुईकोट किल्ला येथुन व मुख्य पेठेतुन श्रीं ची पालखीतुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. तसेच यावेळी रांगोळी व फुलांच्या व वस्त्रांच्या पायघड्या घालण्यात आल्या. तसेच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच ढोल ताशा व झांज पथकाच्या वेगवेगळ्या खेळासह 'श्री' ची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मावळ तालुक्यातील झांज पथक तसेच हलगी पथक उपस्थित शिवप्रेमीचे लक्ष वेधुन घेत होते. या मिरवणुकीत झांज पथकासह शिवराय, जिजाऊ, सईबाई आणि मावळे आदींची वेशभुषा करून तरुणाई घोड्यांवर स्वार झाली होती. यावेळी मिरवणुकीत रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
       दरम्यान आजाद मैदानावर  सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे, उपनिरिक्षक समिर शेख यांच्या हस्ते महाआरती करुन शिवजयंतीचा समारोप करण्यात आला. 
                   --------------------
To Top